पुन्हा चंद्राबाबू

naidu
तेलुगु देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी एकेकाळी आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून नऊ वर्षे कार्यक्षमतेने काम केले आहे. आज नरेन्द्र मोदी ज्या क्षमतेने पंतप्रधानपदाचा कारभार पहात आहेत त्याच क्षमतेने नायडू यांनी आंध्राचा कारभार पाहिला होता. त्या काळात त्यांना राज्याचा मुख्यमंत्री न म्हणता राज्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी असे म्हटले जात असे. आता ते पुन्हा एकदा अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झाले आहेत पण फरक एवढाच की, त्यांची सत्ता आता विभाजनानंतरच्या म्हणजे तेलंगणा वगळून असलेल्या सीमांध्रा भागावरच राहणार आहे. ते आता खंडित आणि विभाजित आंध्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. आंध्र प्रदेशाच्या विभाजनात उदंड राजकारण झाले. त्यातून कॉंग्रसची सद्दी संपली. तशी चंद्राबाबूंचीही संपेल असे वाटले होते पण त्यांनी प्रतिकूलतेवर मात करून चक्क सत्ता हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

कॉंग्रेसच्या नेत्यांनी या प्रश्‍नावर सातत्याने डबलरोल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा पक्ष तिथून संपला. २००४ आणि २००९ सालच्या लोकसभा निवडणुकांत ज्या राज्याने कॉंग्रेसला तब्बल ३६ खासदार देऊन सत्ताप्राप्तीसाठी आवश्यक त्या सदस्य संख्येत सिंहाचा वाटा उचलला होता त्या राज्यात कॉंग्रेसा भोपळाही फुटू नये हे या पक्षाच्या राजकारणाचा परिपाक आहे. तेलंगण हे २९ वे राज्य म्हणून अस्तित्वात आले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्याच्या विधानसभा वेगळ्या झाल्या. तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सत्ता प्राप्त करण्याचा मान अपेक्षेप्रमाणेच तेलंगण राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव यांना मिळाला. तेलंगणात कॉंग्रेसकडे तेलंगण निर्मिती करणारा पक्ष म्हणून पाहिले जाईल आणि या नव्या राज्यात तरी आपल्याला सत्ता मिळेल असा कॉंग्रेसच्या नेत्यांचा कयास होता. पण शेवटी या राज्य निर्मितीचे श्रेय तेलंगणा राष्ट्र समितीलाही जाते कारण याच पक्षाने या मागणीचे आंदोलन केले होते. तिथल्या जनतेने तेरासला कौल दिला.

कॉंग्रेसचे नेते नेहमी चढेलपणा करत असतात. तसा त्यांनी तेलंगणाच्या राजकारणातही केला. तेरासचे नेते चंद्रशेखर राव यांच्याशी त्यांनी युती करायला हवी होती पण त्यांच्याशी जमवून घेतले नाही. शेवटी तेरासने स्वतंत्रपणे सत्ता प्राप्त केली. कॉंग्रेसला उर्वरित आंध्रात तर फटका बसलाच पण तेलंगणातही निराश व्हावे लागले. चंद्राबाबू नायडू यांनी तडजोड करण्याचा शहाणपणा दाखवला. तिथे वायएसआर कॉंग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी हे नको एवढ्या गर्वात गेले. चंद्राबाबू नायडू १९९५ ते २००४ या कालावधीतआंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री होतेच. दहा वर्षानंतर चंद्राबाबू पुन्हा सत्तेवर येत आहेत. उर्वरित आंध्र प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री असा मान त्यांना मिळाला आहे. आंध्र प्रदेशातलेे राजकारण फार गुंतागुंतीचे झाले होते. चंद्राबाबू नायडू यांचा तेलुुगु देसम पक्ष लोकांच्या विस्मरणात गेला होता. पण त्याला अनपेक्षितपणे यश मिळाले. आंध्र प्रदेशाच्या या भागात त्यांच्याविषयी म्हणावा तेवढा असंतोष दिसला नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्राबाबू नायडू यांनी राजकीय कौशल्याचा वापर केला. त्यांनी भारतीय जनता पार्टीशी युती केली आणि मोदी लाटेचा फायदा घेतला. शिवाय जगनमोहन रेड्डी यांच्या भ्रष्टाचारावर त्यांनी जबरदस्त हल्लाबोल केला. त्यामुळे जगनमोहन रेड्डी तेलंगणाच्या विरोधात असले तरी त्यांना आंध्रातल्या लोकांचा पाठींबा मिळाला नाही. त्यांचा अप्रतिहत भ्रष्टाचार त्यांना महागात पडला. तेही मागे पडले आणि त्यांनी कॉंग्रेसलाही संपवले.

चंद्राबाबू नायडू हे कुशल प्रशासक आहेत आणि आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी आंध्रासाठी बरेच काही केलेले आहे. त्याचीही आठवण त्यांनी जनतेला करून दिली. २०१० साली तेलुगु देसम पक्षाला आंध्र प्रदेशामध्ये चिरंजीवी यांच्या प्रजा राज्यम् पक्षामुळे मोठा शह मिळाला होता. मात्र चिरंजीवी यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आपला पक्ष बरखास्त केला. त्याचा राग चिरंजीवी यांच्या अनुयायांमध्ये आहे. या अनुयायांनी चिरंजीवी यांचे बंधू पवनकल्याण यांना पाठींबा दिला आणि अन्यथा चिरंजीवी यांचा असलेला जनाधार पवनकल्याण यांना लाभला. चंद्राबाबू नायडू यांनी पवनकल्याण याला आपलेसे केले आणि हा जनाधार आपल्या पक्षाकडे वळवला. त्यामुळे नायडू यशस्वी होऊ शकले. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तेलंगण निर्मिती करताना उर्वरित आंध्र प्रदेशाला स्पेशल पॅकेजचे आश्‍वासन दिलेले आहे. ते आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाळावे लागणार आहे. नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून, त्यांनी आंध्राला दिलेली आश्‍वासने आपले सरकार पाळेल असे वचन दिले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशाच्या विकासाची जबाबदारी घेणार्‍या चंद्राबाबू नायडू यांना बरेच काही करता येणार आहे. १९९८ ते २००४ या काळात त्यांनी केन्द्रातल्या वाजपेयी सरकारला पाठींबा दिला होता आणि त्यांच्याकडून भरपूर निधी मिळवून आंध्र प्रदेशात अनेक योजना राबवल्या होत्या. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली होती. विकासाच्या अनेक नव्या योजना आखणे आणि त्या अभिनव पद्धतीने राबवणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांना आता केन्द्राच्या मदतीने विकासाच्या अनेक योजना राबवणे शक्य होणार आहे . उर्वरित आंध्राची वाटचाल वेगाने होणार आहे.

Leave a Comment