पाकचा तेहरीक ए तालिबानला धडा शिकविण्याचा निर्णय

taliban
कराची विमानतळावर झालेल्या हल्याची जबाबदारी स्वीकारणार्‍या पाकिस्तानातील तेहरिक ए तालिबान संघटनेला कायमचा धडा शिकविण्याचा निर्णय पाकिस्तानात पंतप्रधान शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीत एकमताने घेतला गेला असल्याचे वृत्त आहे. या बैठकीला पाक सेनेतील वरीष्ठ अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. त्यात या संघटनेचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कांही उपाय सुचविले गेले असून त्यावर पुढच्या आठवड्यात होत असलेल्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन दिवसांत दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत आणि त्यात ३७ जणांचा मृत्य झाला आहे. हे हल्ले कमांडो पद्धतीने केले गेल्यामुळे पाकिस्तानी सेनाधिकारी चिंतेत पडले आहेत. हल्लेखोरांनी पाक सैनिकांच्या वेशात विमानतळावर प्रवेश केला होता त्यामुळे ही बाब गंभीरपणे घेतली गेली पाहिजे असे सुरक्षा सल्लागार इम्तियाज गुल यांचे म्हणणे आहे.

उझबेकिस्तानमधील इस्लामिक मुव्हमेंटचे कांही लोक तसेच कांही चीनी बंडखोरांनी वझिरीस्तानच्या डोंगरात आश्रय घेतला आहे आणि तालिबान्यांनी त्यांना आश्रय दिला आहे. हे लोक तालिबानसाठी काम करत असून कराची हल्लयात याच लोकांचा हात होता असा संशय आहे. अफगाणिस्तानत २००१ साली झालेल्या चकमकीत उझबेग अतिरेक्यांचा जवळजवळ पूर्ण खातमा झाला होता मात्र ते पुन्हा एकत्र आले आहेत आणि त्यांना पाक तालिबानी कमांडरने आश्रय दिला असल्याचे गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे या संघटनेला चांगला धडा शिकवायचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

कराची हल्ल्याप्रकरणी तहरिक ए तालिबानचा नेता मुल्ला फजलुल्ला, प्रवक्ता शाहीदुल्ला शाहीद व संघटनेच्या अन्य नेत्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment