मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कॉंग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्याच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या असून मध्यंतरी थंडावलेली मुख्यमंत्री हटाव मोहीम सुरु झाली आहे, त्यात हायकमांड मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘नारळ’देण्याच्या विचारपर्यंत आल्याचे ‘वारे’ही कॉंग्रेसच्या वर्तुळात जोरात ‘वाहत’ आहेत.
कॉंग्रेसमध्ये पुन्हा मुख्यमंत्री बदलाचे ‘वारे’ ; राणेंचे नाव स्पर्धेतून ‘गायब’
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशासह राज्यातही काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. महाराष्ट्रात तर काँग्रेसचे फक्त दोनच खासदार निवडून आले आहेत. राज्यातील या पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माथी फोडण्यात येत आहे. यामुळेच पृथ्वीराजबाबांची मुख्यमंत्री पदावरून गंच्छती करण्यात येणार असल्याचे समजते आहे. त्यात लोकसभा निवडणुकीतील पराभवाला मुख्यमंत्री चव्हाण हेच जबाबदार असल्याचे भासवत राष्ट्रवादीनेही आगामी विधानसभा निवडणूकीत ‘एकला चलो रे ‘ची तयारी केल्याचे सूत्रांचे म्हणणे असले तरी राष्ट्रवादीच काय कॉंग्रेसमधील नेत्यांना ‘फाईलीं’वर सही न करणारे ‘बाबा’ नकोसे झाले आहेत.