महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या उद्गारांनी खळबळ उडवून दिली आहे. प्रत्येक घरात एक पोलीस नेमला तरी बलात्कार थांबणार नाहीत, असे आहेत त्यांचे हे ऐतिहासिक उद्गार. आधी तर या देशात बलात्कार हा प्रकार वादग्रस्त आणि काळजीचा विषय झाला आहे. अशा नाजूक आणि संवेदनशील विषयावर आराराबांनी हताशपणाचे उद्गार काढावेत ही घटना खळबळजनक आहे. हा त्यांचा काही पहिला प्रकार नाही. २००८ च्या नोव्हेंबरमध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यांच्या वेळी त्यांनी नको ते बोलून गृहमंत्रिपद गमवले होते. पण आता पुन्हा एकदा त्यांनी असाच प्रकार केला आहे पण आता त्यांना राजीनामा मागावा अशी काही स्थिती नाही. कारण त्यांच्या हातात सत्ता हा आता काही दिवसांचाच प्रकार आहे. जनता त्यांच्या एकूण चुकांचे माप त्यांच्या पदरात घालून घरी पाठवणारच आहे. आबांचे हे नकारात्मक उद्गार त्यांना भोवले आहेत. तेच सकारात्मकतेने काढले असते तर फार काही बिघडले नसते. आर.आर. पाटील यांच्या या उद्गारामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली. अन्य कोणत्या मंत्र्याने असे उद्गार काढले असते तर एवढी खळबळ माजली नसती. एवढेच काय आबांच्या ऐवजी दुसरा कोणी गृहमंत्री असता आणि त्याने असे उद्गार काढले असते तरीही एवढी खळबळ माजली नसती. मग आबांनीच हे उद्गार काढल्यानंतर एवढी खळबळ का माजली? कारण आबा हा हतबलता व्यक्त करणारा मंत्री नाही.
आबांची नेमकी चूक काय?
आर.आर. पाटील हे नेहमी राणा भिमदेवी थाटात बोलणारे मंत्री आहेत. कोणत्याही प्रकरणात ते नेहमी कडक बोलत असतात. कठोर शिक्षा करू, सोडणार नाही, सक्त कारवाई करू, कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू असली वाक्ये ते उच्चारत असतात. त्यामुळे अशा माणसाने बलात्कार रोखणे शक्य नाही असे उद्गार काढले की, ते अनपेक्षित ठरते आणि खळबळ उडवून देते. आर.आर. आबांनी जे काही म्हटले आहे ते तर्कशास्त्राच्या दृष्टीने बरोबर आहे. मात्र मंत्र्यांनी नकारात्मक भाषा वापरायला नको आहे. त्यांनी दिलेली आकडेवारी खरी आहे. बरेचसे बलात्कार हे पीडित महिलेच्या परिचयातल्या व्यक्तीनेच केलेले असतात हे सत्य आहे. आता कोणती परिचित व्यक्ती कोणत्या महिलेवर अचानकपणे बलात्कार करणार आहे हे आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे बलात्कार हा एक वैयक्तिक गैरव्यवहार ठरतो. असे बलात्कार रोखणार तरी कसे? हा प्रश्न चुकीचा नाही. बलात्काराच्या काही प्रकरणात तर मोठी विचित्र परिस्थिती असते. सध्या बलात्काराच्या बाबतीत कठोरपणे चर्चा सुरू आहेत, पीडित महिलांच्या बाजूने बोलले जात आहे.
परंतु बलात्कारच्या एका प्रकरणात हे सत्य सांगितलेच पाहिजे. तो प्रकार म्हणजे लग्नाचे आमिष दाखवून केलेला बलात्कार. एखादा मुलगा एखाद्या मुलीवर प्रेम असल्याचे सांगतो, ते खरेही असेल किंवा खोटेही असेल. परंतु प्रेमाची परिणिती शेवटी लग्नात होत असते आणि हा मुलगा तिला लग्नाचे वचन देतो. लग्न होणारच आहे तर लग्नाच्या आधीच शारीरिक संबंध ठेवायला काय हरकत आहे असा विचार करून हे भावी पती-पत्नी लग्नाच्या आधीच नको इतके जवळ येतात. हे संबंध सुरू असताना तो बलात्कार नसतो. संबंधित मुलीच्या संमतीने ते सुरू असतात. ते असेपर्यंत काही तक्रार नसते. परंतु लग्नाचे वचन मोडले जाते आणि त्यानंतर मात्र त्याच आपखुशीच्या संबंधाचे रुपांतर कायद्याने बलात्कारात होते. बलात्काराच्या नोंदल्या जाणार्या प्रकरणांमध्ये अशा प्रकारांची संख्या मोठी असते. आबांचा प्रश्न असा आहे की, हे बलात्कार रोखणार कसे? त्यांच्या मते आपल्या जीवनामध्ये नैतिक मूल्याचा र्हास झाला आहे आणि त्यामुळे असे बलात्कार होत आहेत. भरपूर पोलीस बंदोबस्त ठेवल्याने हा नैतिक मूल्यांचा र्हास रोखता येत नसतो असे आबांचे म्हणणे आहे.
आपल्या नात्यातली, शेजारची एखादी मुलगी किंवा तरुणी ही आपल्या बहिणीसारखी असते अशी आपली संस्कृती सांगते. मग अशा मुलीच्या किंवा तरुणीच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करणे हे अनैतिक आणि अधार्मिक कृत्य आहे याची जाणीव लोकांत राहिलेली नाही. विवाह हे एक बंधन आहे. देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने विवाहबद्ध झाल्याशिवाय शारीरिक संबंध प्रस्थापित करता कामा नयेत ही आपली संस्कृती आहे, मर्यादा आहे. ती ओलांडल्यामुळे बलात्कार होत असतील तर त्याला पोलीस काय करणार आहेत? आबांचा हा सवाल बिनतोड आहे. परंतु आबांनी तो ज्या पद्धतीने विचारला ती पद्धत मंत्र्याला शोभणारी नाही. नैतिक मूल्यांच्या र्हासामुळे होणारे बलात्कार नैतिक मूल्यांच्या प्रस्थापनेनेच कमी होणार आहेत ही गोष्ट खरी आहे. परंतु गृहमंत्र्यांचे काम बलात्कारानंतर सुरू होत असते. या नैतिक मूल्यांची पायमल्ली करून कोणी बलात्कार करत असेल आणि तो कायद्याने बलात्कार ठरत असेल तर अशा लोकांवर कठोर कारवाई करणे हे गृहमंत्र्यांचे काम आहे. आर.आर. पाटील यांनी बलात्कार शंभर टक्के रोखावेत अशी अपेक्षा त्यांच्याकडून कोणी केलीच नव्हती. त्यांनी नैतिकतेचे प्रवचन देण्याची गरजच नव्हती. बलात्कार घडल्यानंतर पोलीस काय करणार आहेत हा त्यांचा विषय होता. बलात्कारच काय पण समाजातले सगळेच गुन्हे नैतिक मूल्यांचा र्हास झाल्यामुळेच घडत असतात. म्हणून काय गृहमंत्र्यांनी हतबलता व्यक्त करावी का ?