चोरी न होणार्‍या शनिशिंगणापुरात पोलिस ठाणे

shanishinganapur
या गावात कधीच चोरी होत नाही अशी आख्यायिका असलेले महाराष्टातील प्रसिद्ध देवस्थान शनिशिंगणापूर येथे लवकरच पोलिस ठाणे स्थापन केले जाणार असल्याचे वृत्त आहे.

अहमदनगरपासून जवळच असलेले हे पवित्र देवस्थान शनिदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. अशी कथा सांगतात की येथे एका मेंढपाळाला एक साडेपाच फुटी काळा खडक दिसला तेव्हा त्याने खडकावर काठी मारली. मात्र काठी मारताच त्यातून रक्त येऊ लागले. हा चमत्कार पाहून मेंढपाळाने अन्य गावकर्‍यांना गोळा केले. तेव्हा रात्री या मेंढपाळाच्या स्वप्नात येऊन शनिदेवाने तो येथे वास्तव्यास आल्याचे सांगितले. हा खडक स्वयंभू म्हणजे जमिनीतून आपोआप निर्माण झालेला आहे. तेव्हापासून देशविदेशात हे स्थान शनैश्वराचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

येथील शनैश्वराची मूर्ती म्हणजे साडेपाच फुटाचा काळा कातळ असून शनिदेवाने दृष्टांत दिल्याप्रमाणे त्यावर छप्पर नाही. दर आमावस्या व शनिवारी येथे तैलाभिषेक केला जातो. उंच चौथर्‍यावर असलेल्या या देवाची पूजा करण्याची महिलांना परवानगी नाही. कलियुगापासून हा देव येथे असल्याचा भाविकांचा समज आहे.

असा आजपर्यंत समज होता की या गावात कधीच चोरी होत नाही कारण चोरी झाली तर चोरटा आंधळा होतो. शनिदेवांची या गावावर कृपा असल्याने येथे चोरी होत नाही या दृढ विश्वासाने आजही येथील घरांना, दुकानांना दारे नाहीत. दारे नाहीत त्यामुळे कुलपे नाहीत. येथे युनायटेट कमर्शियल बँकेने शाखा उघडली तेव्हा बँकेलाही कुलुप घातले जात नसे. दरवर्षी लक्षावधी भाविक येथे शनिच्या दर्शनासाठी येतात मात्र कधीही भाविकांचे सामान चोरीस गेले नव्हते.

मात्र २०१० साली येथे पहिली चोरी झाली. दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या गाडीतून रोख रकमेसह ३५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आणि त्यानंतर २०११ साली शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या ट्रस्टींच्या घरातच चोरांनी डल्ला मारून ५० हजारांचा ऐवज पळविला. तेव्हा मात्र येथे पोलिस चौकीची स्थापना करण्यात आली व आता महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे देवस्थानांच्या ठिकाणी पोलिस ठाणे बंधनकारक करण्यात आले असल्याने येथे पोलिस ठाणेही उभारले जाणार आहे.

Leave a Comment