आर्ट ऑफ लिव्हींगच्या सदस्यांना पाक तालिबान्यांकडून धमक्या

artofliving
पाकिस्तानातील आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेच्या सदस्यांना आणि कार्यकर्त्यांना गेले दोन महिने पाकिस्तानातील तालिबान्यांकडून फोन व पत्रांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात असल्याचे समजते. इस्लामविरोधी कटकारस्थाने करण्याच्या आरोपावरून या धमक्या दिल्या जात असून त्यासंबंधी पाकिस्तानमधील संबंधित पोलिस अधिकार्‍यांना याची माहिती देण्यात आली आहे.

श्रीश्री रविशंकर यांनी स्थापन केलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे इस्लामाबाद जवळच्या बानी गाला येथे असलेले सेंटर ८ मार्च रोजी तोडफोड करून बंद पाडले गेले होते. १५ बंदुकधार्‍यांनी त्यावेळी तेथे धुडगुस घातला होता. तेव्हापासून हे धमकी सत्र सुरू झाले आहे. गेली १३ वर्षे आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून साधकांना तणावमुक्ती आणि श्वासतंत्राचा योगाभ्यास यांचे प्रशिक्षण दिले जात असून त्यात कोणत्याही जातीधर्माविषयी कांहीही सांगितले जात नाही. पाकिस्तानात आर्ट ऑफ लिव्हींगचे १० हजाराहून अधिक सदस्य आहेत. पाकिस्तानबरोबरच अन्य कांही मुस्लीम देशातही या संस्थेचे सदस्य असून ते नियमाने हा योगाभ्यास करतात आणि त्यात मुस्लीमांची संख्या लक्षणीय आहे.

पाक संस्थेतील मुस्लीम सदस्य दरवर्षी भारतात प्रमुख केंद्र बेंगलोर येथे नियमित भेटीवर येत असतात मात्र तरीही इस्मालविरोधात प्रचार करण्याचे काम ही संस्था करत असल्याचा तालिबान्यांचा आरोप आहे असे सांगितले जाते.

Leave a Comment