शरद पवारांचा ‘तोल’ गेलाय – उद्धव ठाकरेंची टीका

udhdhav
मुंबई – पुण्यात एका निरपराध तरुणाची हत्या झाली. हा प्रकार मानवतेला कलंकच आहे. पण, महाराष्ट्रातील हत्येशी मोदी सरकारचा काय संबंध? असा सवाल करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. राज्यात पवारांचे राज्य आहे. गृहमंत्री त्यांच्या पक्षाचा आहे. त्यामुळे अशी हत्या होणे हे त्यांच्या सरकारचे अपयश आहे, पुण्यात वर्षभरापूर्वी नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली, तेव्हा दिल्लीत मोदींचे सरकार नव्हते .

कसाबने हल्ला केला, तेव्हाही दिल्लीत मोदी सरकार नव्हते मग ,केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर १५ दिवसांतच जातीय तणाव वाढण्यास सुरुवात झाली आहे, असा आरोप करणाऱ्या शरद पवार यांचा लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे तोल गेला आहे, ते पाकिस्तानच्या हाफीज सईदप्रमाणेच बरळू लागले आहेत या शब्दात पवारांच्या वक्तव्यावर ठाकरे यांनी सणसणीत चपराक लगावली आहे.

केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर १५ दिवसांतच जातीय तणाव वाढण्यास सुरुवात झाली आहे, असा आरोप शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात केला होता. देशात मोदी सरकार आल्याने काही धर्मांध संघटनांची हिंमत वाढली आहे. अशाच शक्तींनी पुण्यात एका अल्पसंख्याक समाजाच्या युवकाची हत्या केली आहे, असे खापर केंद्र सरकारवर फोडले होते. पवारांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार ‘सामना’च्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे. पुण्यातील खुनाची जबाबदारी राज्य सरकारची आहे, मोदींचा किंवा केंद्राचा त्याच्याशी काहीच संबंध नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment