४४ टोलनाक्यांवर आता ‘अच्छे दिन’, आता श्रेयावरून ‘नाकाबंदी’

toll_3
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील कटू अनुभव लक्षात घेवून राज्य सरकारने राज्यातील कमी अंतराचे ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी जनतेला ‘अच्छे दिन ‘येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) ३४ आणि महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे ६ टोलनाके बंद होणार आहेत .सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीच्या टोलमधून एस.टी.बसला सवलत मिळणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी केली.

राष्ट्रीय महामार्गावरील टोलमधून एसटीला सवलत मिळावी, यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचेही ते म्हणाले.राज्यात एकूण १६६ टोलनाके आहेत. एमएसआरडीसीचे ५३ तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे ७३ टोलनाके आहेत. राष्ट्रीय महामार्गावर एकूण ४० टोलनाके आहेत. दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विकसकांचे सर्व पैसे परत करून टोल नाके रद्द करण्यात आले आहे तर सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र मी रकमेचे आणि कमी अंतरावरील टोल रद्द करण्यासंदर्भातील फाईल सहा महिन्यांपूर्वीच अर्थखात्याकडे पाठविण्यात आली होती. परंतु, अर्थखात्याने निर्णय घेण्यास विलंब केला असे म्हटले आहे. टोलचा मुद्दा हा विरोधी पक्षाने कायम लावून धरला यामुळेच सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली.मात्र मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सारे श्रेय मनसेचेच अशीच मोहोर उमटवली आहे,ते म्हणतात ,मनसेच्या आंदोलनावर टीका करण्याना बसलेली ही चपराक आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे ‘देर आये दुरुस्त आये’, असेही राज ठाकरे म्हणाले. परिणामी टोल रद्दच्या निर्णयामुळे राजकारण्यांमध्ये श्रेयाची ‘नाका’बंदी सुरु झाली आहे.

Leave a Comment