नैसर्गिक देणगीवर भर

oil
पश्‍चिम आशियातले तेलसंपन्न देश पूर्वी फार गरीब होते पण आपल्या जमिनीत निसर्गाने प्रचंड मोठे इंधन तेलाचे साठे ठेवल आहेत. याची जाणीव त्यांना झाली आणि ही नैसर्गिक देणगी त्यांनी वापरली तेव्हा ते किती श्रीमंत झाले. भारताची अवस्था अशीच आहे. या देशाला निसर्गाने भरभरून दिले आहे. मात्र या नैसर्गिक संपत्तीचा कमाल वापर करावा आणि देशाला समृध्दी प्राप्त करून द्यावी, असे जाणीवपूर्वक नियोजन केले गेले नाही. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षात देशाला फार काही साध्य करता आले नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमके हेच मर्म हेरून देशाच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट समोर ठेवला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हा नकाशा संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर झालेल्या आल्या अभिभाषणातून देशासमोर ठेवला आहे. नरेंद्र मोदी हे चुकून माकून, अपघाताने किंवा अनपेक्षितपणे पंतप्रधान झालेले नाहीत. ते ठरवून पंतप्रधान झालेले आहेत आणि हे पद मिळाल्यानंतर देशाच्या विकासाची कोणती दिशा आपण पकडायची आहे याची पूर्ण मांडणी त्यांनी केलेली आहे. त्यांच्या या निर्धाराचे दर्शन राष्ट्रपतींच्या अभिभाषणात झालेले दिसत आहे. त्यावर नजर टाकली असता असे लक्षात येते की, नरेंद्र मोदी यांच्या मते देशाच्या प्रगतीसाठी निसर्गाने आपल्याला जे काही दिले आहे त्याचा वापर केला पाहिजे आणि अशाच गोष्टीवर भर देऊन नरेंद्र मोदी पुढच्या साठ महिन्यांचा कार्यक्रम आपल्या समोर ठेवत आहेत.

राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणामध्ये मोदी सरकारच्या तातडीच्या उपाययोजना आणि दूरगामी उपाययोजनांच्या लेखाजोखा उत्तमपणे मांडलेला आहे. नरेंद्र मोदी हे लोकांच्या मोठ्या आशा आकांक्षांच्या पार्श्‍वभूमीवर सत्तेत आलेले आहेत. यापूर्वीही विविध पक्षांचे आणि आघाड्यांचे सरकारे केंद्रात सत्तेवर आली परंतु त्यांना स्पष्ट बहुमत नसल्यामुळे त्यांच्या कामात अनेक अडथळेही आले. विशेषतः कोणताही निर्णय घेताना विविध सरकारांना आघाडी असणे हीच अडचण ठरली. आघाडीतील घटक पक्षांची विविध निर्णय घेताना जी ओढाताण झाली तिच्यामुळे अनेक निर्णय लांबणीवर पडत गेले. मात्र आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालो आघाडी सरकारला अशा अडचणीला तोंड द्यावे लागणार नाही. जनतेने या सरकारला स्पष्ट आणि निर्विवाद बहुमत दिले आहे. त्यामुळे वेगाने निर्णय घेण्यात काही अडचण राहणार नाही. काही विधेयके मंजूर करताना राज्यसभेत बहुमत नसल्याची अडचण येऊ शकेल परंतु तशी ती येऊ नये या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांशी आतापासूनच चर्चा करून ठेवली आहे. म्हणजेच मोदी सरकारने प्रामाणिकपणे निर्णय घेतलेच तर देशाचे चित्र बदलण्याचे भाग्य त्यांना लाभल्याशिवाय राहणार नाही.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अजेंडा स्पष्ट करणार्‍या राष्ट्रपतींच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी डोळ्यासमोर ठेवलेली ब्ल्यू प्रिंट किंवा विकासाचा नकाशा स्पष्टपणे दिसत आहे. धोरणे ठरवण्याच्या पातळीवर सरकारने त्रिसूत्री डोळ्यासमोर ठेवली आहे. कोणतेही विकासात्मक धोरण ठरवताना त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर सरकारचा भर राहणार आहे. विशेषतः पारदर्शक धोरणावर सरकारचा भर राहील. कारण गेल्या दहा वर्षात याच एका गोष्टीचा मोठा अभाव सरकारच्या पातळीवर दिसून आलेला आहे. खरे म्हणजे सरकारला उत्पन्नाची अनेक साधने असतात. त्यातली काही साधने कसलाही खर्च न करता सरकारला उत्पन्न मिळवून देत असतात. त्यात खनिजांचा प्राधान्याने समावेश होत असतो. खनिजापासून सरकारला भरपूर उत्पन्न होईल याची दक्षता घेतली तर सरकारच्या आर्थिक परिस्थितीचे चित्र बदलू शकते. कारण खनिजापासून पैसा भरपूर मिळू शकतो आणि ती निसर्गतःच जमिनीत उपलब्ध असतात. दुसरी गोष्ट आहे, दूरसंचार क्षेत्राची. देशातले मोबाईल फोन, टी. व्ही., रेडिओ यांच्यातील संवाद साधनासाठी हवेतले विविध प्रकारचे ध्वनीतरंग वापरले जातात. त्या ध्वनीतरंगांसाठी सरकारने पैसे गुंतवलेले नसतात तर ते निसर्गतःच उपलब्ध असतात.

मात्र त्यापासून विविध कंपन्यांना मिळणारे उत्पन्न अमाप असते. तेव्हा सरकारसाठी बिनखर्ची या साधनामधून सरकारचे उत्पन्न वाढू शकते. तेव्हा नैसर्गिक संपत्ती व्यवस्थित वापरण्याचे नियोजन केले तर सरकारला भरपूर पैसा मिळू शकतो. या गोष्टींकडे मनमोहनसिंग सरकारने दुर्लक्ष केले. देशाजवळ अशाच आणखी काही गोष्टी आहेत ज्या विकत आणलेल्या नाहीत. पण त्यापासून मिळणारे उत्पन्न अमाप असते. त्यातले एक साधन म्हणजे देशातल्या तरुणांची बुध्दीमत्ता. बुध्दीमत्ता निसर्गतःच उपलब्ध असते परंतु त्या बुध्दीमत्तेचा वापर करून जे तंत्रज्ञान निर्माण केले जाते त्यातून अब्जावधी रुपये मिळत असतात. याची जाणीव नरेंद्र मोदी यांच्या ब्रँड इंडिया या कार्यक्रमात दिसते. देशाचे पर्यटन हे सुध्दा असेच एक साधन आहे. ज्यासाठी सरकारला काहीच खर्च करावा लागत नाही. परंतु देशाला लाभलेल्या निसर्ग सौंदर्याचा वापर नीट केला आणि जगभरातल्या पर्यटकांना आकृष्ट केले तर देश समृध्द होऊ शकतो. अमेरिकेच्या आणि चीनच्या प्रगतीकडे पाहिल्यास एक गोष्ट लक्षात येते की चीनची प्रगती ही उत्पादन क्षेत्रातून साध्य झालेली आहे. अमेरिकेची श्रीमंती मात्र तंत्रज्ञान आणि उत्पादन या दोन्हींच्या संयोगातून झालेली आहे. तंत्रज्ञान विकसित करण्यास काही लाख रुपये लागतात परंतु त्यापासून मिळणारे उत्पन्न अब्जावधीत असते. दक्षिण कोरियाच्या प्रगतीचे लक्षण हेच आहे. तेव्हा बुध्दीमत्तेचा वापर करून टेक्नॉलॉजी विकसित करण्याचा या सरकारचा हेतू प्रदीर्घ विचाराअंती तयार झालेला आहे. निसर्गाने आपल्याला काय दिले आहे याचा वापर करा आणि समृध्दी प्राप्त करा असा त्याचा संदेश आहे.

Leave a Comment