दबलेला आवाज होतोय बुलंद

congress
कॉंग्रेसला यश मिळाले की त्याचे श्रेय गांधी घराण्याला दिले जाते. पण अपयश आल्यास मात्र त्यांना गांधी घराणे कारणीभूत नसते हे कोणत्या तर्कशास्त्रात बसते हे विचारायचे नाही. विचारायचा प्रयत्न केल्यास पक्षाबाहेर काढले जाईल. म्हणून अनेकांच्या मनात पक्षश्रेष्ठींच्या विरोधात खदखद असतानाही कोणी बोलत नाही. मात्र ही खदखद फार दिवस दबून राहणार नाही. तिचा गौप्यस्फोट कधी ना कधी तरी होणारच आहे. काल बॅ. अ. र. अंतुले यांनी आपल्या मनातली खदखद स्पष्टपणे बोलून दाखवली. अंतुले यांनी लोकसभेच्या निवडणुकीतील कॉंग्रेसच्या पराभवाला पक्षश्रेष्ठीच जबाबदार असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. यापूर्वी काही लोकांनी आडून आडून तसे सूचित करण्याचा तसा प्रयत्नही केला होता आणि काहींनी प्रत्यक्षपणे राहुल गांधींवर टीकाही केली होती परंतु त्याचा पक्षश्रेष्ठींवर काही परिणामही झाला नाही आणि पक्षाने यातल्या दोघांना तरी बाहेरचा रस्ता दाखवला. कॉंगे्रस श्रेष्ठींनी असा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी तरी सत्य समोर येणार आहे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये गांधी घराण्याविषयी असलेला क्षोभ निश्‍चित व्यक्त होणार आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर पराभवाची जबाबदारी कोणी टाकू नये यासाठी त्यांचे खास खुषमस्करे सावधान आहेत. तशी थोडीही शक्यता दिसायला लागताच ती व्यक्त करणार्‍यावर ते टीकेचे आसूड ओढायला लागतात. केरळातील एका माजी मंत्र्याने आणि राजस्थानातील एका आमदाराने पराभवाला राहुल गांधीच जबाबदार असल्याचे ठासून सांगितले खरे पण दोघांना पक्षातून काढून टाकण्यात आले. यापुढे काढून टाकण्याचा उपयोग होणार नाही. कारण हकालपट्टीला घाबरावे अशी काही कॉंग्रेसची स्थिती राहिलेली नाही. हळूहळू करत का होईना कॉंगे्रसमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधातला आवाज बुलंद व्हायला लागणार आहे. गेल्या आठवड्यातील घटना या दृष्टीने बोलक्या आहेत. कॉंग्रेसचे नेते पराभवाने खचून गेले आहेत हे खरे परंतु भाजप सरकार काहीतरी चुका करीलच आणि त्याच्यावर टीका करण्याची संधी आपल्याला मिळेल आणि तसे टीकेचे सत्र सुरू झाले की कॉंगे्रेस कार्यकर्त्यांचे मनोबबल नक्कीच वाढायला लागेल असा विश्‍वास काही कॉंग्रेस नेत्यांना अजूनही वाटतो. मोदींची लाट ओसरेल आणि आपोआपच कॉंग्रेसला बळ मिळेल अशी त्यांना आशा आहे. मात्र गेल्या १५ िदवसात तरी नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला तशी संधी दिलेली नाही. अतीशय परिपक्वपणे त्यांनी सार्‍या गोष्टी करायला सुरूवात केली आहे.

प्रशासनाला जागे केले आहे आणि दणादण मोठे निर्णय घेतले आहेत. माजी परराष्ट्र राज्य मंत्री शशी थरुर यांना ही गोष्ट जाणवत आहे. म्हणून त्यांनी मोदींची प्रशंसा केली. मोदी सर्वांना सोबत घेऊन जात आहेत. त्यांना आपण सहकार्य केले पाहिजे असे त्यांनी म्हटले. त्यामुळे कॉंग्रेसचे नेते चांगलेच चवताळले. शशी थरुर यांच्या विधानामध्ये पक्षश्रेष्ठींना दोषी धरण्याचा एक सूर आहे आणि त्यामुळेच गांधी घराण्याविषयी निष्ठा असणार्‍या कॉंग्रेसच्या नेत्यांत चांगलीच चलबिचल सुरू झाली आहे. अशा नेत्यांनी शशी थरुर यांच्यावर टीका करून त्यांचा सूर मवाळ करण्याचा प्रयत्न केला. पण पाठोपाठ मुंबईतून पराभूत झालेले संजय निरुपम यांनी एक तिरपा बाण सोडलाच. देशात कॉंग्रेसच्या विरोधात एवढे वातावरण होते की, कॉंग्रेसच्या तिकिटावर नरेंद्र मोदी उभे राहिले असते तरी ते पराभूत झाले असते असे उद्गार त्यांनी काढले. याचा अर्थ कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा चांगली नाही आणि त्याला पक्षश्रेष्ठी जबाबदार आहेत असाच होतो. शशी थरुर यांच्या पाठोपाठ संजय निरुपम यांचे हे विश्‍लेषण पक्षश्रेष्ठींच्या रोखाने जाणारे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींच्या नजिकची मंडळी सावध झाली आणि त्यांनी निरुपम यांच्या म्हणण्याशी असहमती दर्शवली.

एकेकाचा खुलासा केला तरी हळूहळू का होईना पण नव्याने कोणीतरी सोनिया आणि राहुल गांधी यांच्याकडे अंगुलीनिर्देश केल्याशिवाय राहणार नाही असे दिसत आहे. आता संजय निरुपम यांच्या पाठोपाठ कोणाचे विश्‍लेषण समोर येत आहे याची उत्सुकता लागून राहिलेली असतानाच बॅ. अ.र. अंतुले पुढे सरसावले आणि त्यांनी पक्षश्रेष्ठींचे नाव घेऊन कसलाही आडपडदा न ठेवता त्यांना दोषी जाहीर केले. पक्षश्रेष्ठींना हा आरोपांचा सिलसिला फार काळ रोखता येईल असे वाटत नाही. नरेंद्र मोदी यांनी असाच परिपक्व दृष्टिकोन समोर ठेवला तर कॉंगे्रसचे नेते निरुत्तर व्हायला लागतील आणि पक्षात निराशा दाटून यायला लागेल. कॉंग्रेस पक्षामध्ये नेहमीच असे म्हटले जाते की, कॉंग्रेसच्या नेत्यांचे गांधी घराण्याविषयीचे प्रेम हे स्वार्थावर आधारलेल आहे. गांधींच्या नावावर सत्ता मिळत असेल तरच ते त्यांच्यावर निष्ठा ठेवतील पण गांधी घराणे चांगले नेतृत्व देऊन गांधी घराणे आपल्याल सत्ता मिळवून देणार नाही असे जाणवायला लागले की ते दुसरा पर्याय शोधायला लागतील. आता हळूहळू ही प्रक्रिया गतिमान व्हायला लागेल. सत्य हे नेहमीच जलाशयाच्या तळाशी असते आणि भरपूर घुसळण झाल्याशिवाय ते वर येत नाही असे म्हणतात. ते काही खोटे नाही.

Leave a Comment