उटण्याच्या लेपमुळे ताजमहाल पुन्हा चकाकणार

taj
जगात प्रेमाची निशाणी म्हणून प्रसिद्ध असलेला आग्रा येथील ताजमहाल प्रदूषणापासून वाचावा यासाठी त्यावर उटण्याचा लेप देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे पांढर्‍या रंगाच्या संगमरवराला पुन्हा पहिली चमक मिळू शकणार आहे. प्रदूषणामुळे ताजमहालाचे शुभ्र संगमरवर पिवळे पडू लागले आहे. अशा प्रकारची प्रक्रिया करण्याची ही चौथी वेळ आहे.

भारत पुरातत्त्व सर्वेक्षण अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार १७ व्या शतकांत बादशहा शहाजहान याने पत्नी मुमताज हिच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून बांधलेली ही सुंदर इमारत प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. वरीष्ठ अधिकारी बी.एम. भटनागर यांनी दिलेल्या माहितीनुसार महिला चेहरा तजेलदार बनविण्यासाठी ज्या प्रमाणे उटण्याचा लेप देतात तशीच ही प्रक्रिया आहे. ही पद्धत पारंपारिक आहे. यापूर्वी १९९४,२००१ व २००८ साली अशीच प्रक्रिया ताजमहालावर केली गेली होती. यासाठी २ मिमि जाडीचा उटण्याचा थर भिंतीवर चढविला जातो. दुसरे दिवशी अगोदर नाजूक ब्रशच्या सहय्याने स्वच्छता करून त्यानंतर शुद्ध पाण्याने भिंती धुतल्या जातात. २००८ साली केलेल्या प्रक्रियेला १० लाख रूपये खर्च आला होता.

१९८३ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा ताजमहालाला दिला आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशविदेशातील पर्यटक या स्थळाला भेट देत असतात.

Leave a Comment