मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

chavan_30
सांगली- राज्यातील कंत्राटी वीज कामगारांना सेवेत कायम करा, राज्यातील बेरोजगारांना बेकारी भत्ता लागू करा आणि कर्जबाजारी बेरोजगारांची कर्जमाफी २५ जून पूर्वी करावी अन्यथा २६ जून पासून या मागणीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानासमोर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या बैठकीत देण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण हे होते.

बेरोजगार संघटनेची तातडीची बैठक सांगलीत पार पडली.या बैठकीत हा इशारा देण्यात आला.राज्यातील २२ हजार कंत्राटी वीज कामगारांना डावलून महावितरणकडून भरती प्रक्रिया अवलंबली जात आहे. त्यामुळे २५ जूनपूर्वी राज्य सरकारने राज्यातील कंत्राटी वीज कामगारांना सेवेत कायम करून अन्य क्षेत्रातील कंत्राटी कमर्चा-यांना विनाअट सेवेत सामावून घ्यावे, वाढत्या बेरोजगारांची संख्या पहात राज्यातील सेवायोजन कार्यालयाकडे नोंद असणा-या बेरोजगारांना महिन्याला किमान ३ हजार रुपये बेकारी भत्ता नोकरी लागेपर्यंत लागू करावा आणि अतिवृष्टी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या कर्जबाजारी बेरोजगारांची १०० टक्के कर्जमाफी करून शेतक-यांप्रमाणे बेरोजगारांचाही सातबारा कोरा करावा; अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या मागणीबाबत राज्यसरकारने २५ जून पूर्वी धोरणात्मक निर्णय घेवून राज्यातील बेरोजगारांना दिलासा द्यावा अन्यथा २६ जून नंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानासमोर राज्यातील हजारों बेरोजगार आणि कंत्राटी वीज कामगार एकत्र येवून आंदोलन करतील; असा इशाराही या बैठकीत देण्यात आला .