पवारांची नवी चाल

pawar_43
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांचे नाव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे असा सूर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उमटला आहे. नरेंद्र मोदी यांच्या यशामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तशी प्रेरणा मिळाली आहे. अर्थात, शरद पवार हे एवढे डावपेच लढवणारे नेते आहेत की, हा त्यांचाही डाव असू शकतो. पवारांचे राजकारण मोठे अगम्य आहे. त्यांच्या इशार्‍याशिवाय पक्षात काही होत नाही. लोकसभेच्या निवडणुकीतील डावपेचातून तसा अनुभवसुध्दा आलेला आहे. तूर्तास तरी पवारांचे हे मुख्यमंत्रीपद म्हणजे कार्यकर्त्यांची इच्छा असे मत झालेलेे आहे. त्याच्या विभागीय मेळाव्यांमध्ये शरद पवार यांचे नाव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे अशी मागणी पुढे आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ महाराष्ट्रात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हातातली सत्ता जाणार हे दोन्ही पक्षांच्या लक्षात आले आहे आणि ही शक्यता टाळण्याचा एक उपाय म्हणून पवारांची ही उमेदवारी पुढे केली जात आहे. त्यामुळे तरी निदान महाराष्ट्रात आपल्या हातात सत्ता राहील. कारण शरद पवार हे महाराष्ट्राला चांगलेच ज्ञात आहेत असे त्यांना वाटते.

तसा विचार केल्यास आज महाराष्ट्रात पवारांच्या तोडीचा नेता कोणी राहिलेला नाही. त्यामुळे त्यांचे हे जे स्थान आहे त्याचा पुरेपूर वापर करून मोदी लाट विधानसभेच्या निवडणुकीत तरी परतवून लावावी असे या कार्यकर्त्यांना वाटते आणि त्यांचे म्हणणे एका परीने बरोबर आहे. परंतु पवारांचे नाव असे जाहीर करण्याने कितीतरी अडचणी येणार आहेत आणि ते नाव जाहीर केल्याने विजय मिळण्याऐवजी पराभवाचीच जास्त शक्यता आहे. मुळात पहिली गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्री जाहीर करायचा झाल्यास शरद पवार यांनाच मोदींबद्दल बोललेले आपले शब्द गिळावे लागतील. मोदींची पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाल्यापासून शरद पवार त्यांच्याविषयी काय काय बोलले होते याची या ठिकाणी सहजच आठवण होते. पहिली गोष्ट म्हणजे पवारांनी त्यांना उतावळा नवरा म्हटले होते. हा तर एक टीकेचा आणि निर्भत्सना करण्याचा राजकीय भाग झाला. परंतु कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कित्येक कार्यकर्त्यांनी आधी उमेदवार जाहीर करणे बेकायदा असल्याचेही म्हटले होते. एवढेच नव्हे तर अशा प्रकारे उमेदवारी जाहीर करून भाजपाने घटनेचा अपमान केला आहे. असाही शोध काही राष्ट्रवादी नेत्याने लावला होता.

शरद पवार यांनी स्वतः मोदींची अशी उमेदवारी करणे हा देशात अध्यक्षीय राज्यपध्दती आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. आता शरद पवार यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करायचे झाले तर आपण दोन तीन महिन्यापूर्वी का बोललो होते हे त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विसरावे लागेल. प्रश्‍न त्यांचा नाही. काल एक भूमिका आणि आज एक भूमिका ही पवारांची सवयच आहे. त्यामुळे त्यांना बोललेले शब्द फिरवणे फारसे अवघड जाणार नाही. आपली मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी जाहीर करण्याची परस्परविरोधी भूमिका घ्याव्या लागतात ही त्यांची अडचण नाही. त्यांना अडचण येणार आहे ती कॉंग्रेसकडून. कारण महाराष्ट्रात या निवडणुकानंतर आघाडीची सत्ता आलीच तर ती एकट्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची असणार नाही. ती राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस अशा दोघांची मिळून आहे. आघाडीतले दोन पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवत असताना त्यातल्या एकाच पक्षाचा उमेदवार हा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कसा असू शकेल? नरेंद्र मोदी यांना ते शक्य झाले कारण त्यांच्याही आघाडीत अनेक पक्ष असले तरी ते पक्ष राष्ट्रीय स्वरूपाचे नाहीत. पण महाराष्ट्रात तसे नाही आणि आघाडीची सत्ता आली तरी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा न होता कॉंग्रेसचा होत असतो.

त्यामुळे कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना अशी घोषणा करू देतील की नाही हाच प्रश्‍न आहे. किंवा पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पवारांचे नाव घोषित करण्याचा आग्रहच असेल तर त्यांना आधी कॉंग्रेसशी असलेली युती मोडावी लागेल. मुख्यमंत्रीपदासाठी पवारांचे नाव जाहीर करण्याचा आग्रह धरणार्‍या कार्यकर्त्यांत एवढा सखोलपणे विचार करण्याची कुवत नाही. ते केवळ पवारांच्या प्रेमापोटी हा आग्रह धरत आहेत. आता त्यानंतरचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. पवारांचे नाव अशा पध्दतीने जाहीर केल्याने पक्षाला काही जास्त जागा मिळणार आहेत का? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तसे वाटत असले तरी पवारांचे वय आणि लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आलेला त्यांचा थकवा या पार्श्‍वभूमीवर लोक त्यांना मुख्यमंत्री करायला तयार होतील का? या प्रश्‍नांच्या अनुरोधाने विचार केल्यास पवारांचा हुकमी एक्का हा फारसा हुकमी राहिलेला नाही हे लक्षात येते. मात्र या सगळ्या प्रकारात कार्यकर्त्यांनी आपल्या नावाचा असा आग्रह धरावा अशी फूस शरद पवार यांनीच स्वतः दिलेली आहे की काय असाही संशय आल्याशिवाय राहत नाही. कारण आता कोणत्याही परिस्थितीत पवारांना केंद्रात सत्ता मिळणार नाही आणि ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे राज्यात या मार्गाने तरी सत्तेची खुर्ची मिळवावी असा प्रयत्न ते करू शकतात. आता त्यांनी सुरूवात करून दिली आहे. राजकारण आणखीन रंगणार आहे.

Leave a Comment