शारापोवा पुन्हा एकदा फ्रेंच टेनिस स्पर्धेची विजेती

shrapova

पॅरिसः फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद रशियाच्या मारिया शारापोवाने पुन्हा एकदा पटकावले आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये शारापोवाने रोमानियाच्या सिमोना हॅलेपवर ६-४, ६-७ (५), ६-४ अशी मात केली. यापूर्वी २०१२ मध्ये शारापोवाने ही स्पर्धा जिंकली होती. शारापोवाचे हे कारकिर्दीतील पाचवे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. यापूर्वी तिने २००४ मध्ये विम्बल्डन, २००६ मध्ये युएस ओपन, २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि २०१२ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती.

फ्रेंच ओपन टेनीस स्पर्धा विजेती शारापोवा जागतिक क्रमवारीत आठव्या, तर रोमानियाची सिमोना चौथ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत या दोघी तीन वेळा आमनेसामने आल्या होत्या. त्यात शारापोवानेच बाजी मारली होती. अर्थात, लौकिक आणि अनुभव पाहता शारापोवाचेच पारडे जड मानले जात होते. अर्थात, सातत्यपूर्ण चांगला खेळ करत अंतिम फेरी गाठणाऱ्या सिमोनाला कमी लेखून चालणार नव्हते. शनिवारी अंतिम लढतीत चौथ्या मानांकित सिमोनाने सुरुवातही जोरदार केली होती. तिने पहिल्याच गेममध्ये शारापोवाची सर्व्हिस भेदली आणि त्यापाठोपाठ सर्व्हिस राखत २-० अशी आघाडी घेतली. मात्र, शारापोवानेही कडवी झुंज देत सलग पाच गेम जिंकले.

दुस-या सेटमध्येही दोघींत सुरुवातीपासूनच प्रत्येक गुणासाठी चुरस होती. अखेरच्या टप्प्यात दोघींनी एकमेकींच्या सर्व्हिस भेदल्याने, अखेरीस हा सेट टायब्रेकमध्ये केला. त्यात सिमोनाने चिवट झुंज देत बाजी मारली आणि आव्हान राखले. निर्णायक तिस-या सेटमध्ये दोघींत चुरस होती. अखेरच्या टप्प्यात नवव्या गेममध्ये शारापोवाने सिमोनाची सर्व्हिस भेदली आणि त्यापाठोपाठ सर्व्हिस राखत शारापोवाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

Leave a Comment