राणे भाजपत आले तर शिवसेना युती तोडणार

rane
मुंबई – उद्योगमंत्री नारायण राणे यांना भाजपने पक्षात घेतले तर शिवसेना भाजपबरोबर असलेली युती तोडण्यास कमी करणार नाही असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. काँग्रेसवर नाराज असलेले उद्योगमंत्री नारायण राणे यांना समजावण्याचे काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न विफल ठरले आहेत आणि नारायण राणे यांनी त्यांच्या समर्थकांसह त्यांच्या निवासस्थानी नुकतीच एक बैठक घेतली आहे. या बैठकीत राणे यांनी पुढची रणनिती ठरविली असल्याचे सांगितले जात आहे. नारायण राणे भाजपत जाणार अशी चर्चा जोरावर असून राणे यांनी या संदर्भात दिल्लीत वरीष्ठ भाजप नेत्यांशी चर्चाही केली असल्याचे समजते.

काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राणे यांना समजावण्याचे सर्व प्रयत्न केले गेले आहेत. मात्र तरीही ते पक्षावर दबाव आणू पाहात असतील तर त्यांच्या दबावाखाली न येण्याचा निर्णय पक्षनेत्यांनी घेतला आहे. नारायण राणे काँग्रेसमध्ये आल्यापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर सतत टीका करत आहेत. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्याबरोबरच सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधातही राणे यांनी हायकमांडकडे वारंवार नाराजी नोंदविली आहे. मात्र हायकमांडने त्यांची नाराजी दुर्लक्षिली आहे.

या सार्‍या घटनांमुळे नारायण राणे काँग्रेस सोडणार हे नक्की मानले जात आहे. मात्र एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नावारूपाला आणलेला हा नेता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मतभेद होताच १० आमदारांसह सेना सोडून कॉग्रेसमध्ये गेल्यामुळे दुखावलेले सेना नेते अद्यापीही त्यांना माफ करायला तयार नाहीत. राष्ट्रवादीबरोबर नारायण राणे यांनी स्वतःच दुश्मनी मोल घेतली असल्याने त्या पक्षात त्यांना स्थान मिळण्याची शक्यता नाहीच. अशा वेळी भाजप हाच त्यांचा मार्ग असू शकतो हे लक्षात घेऊन सेना नेत्यांनी युती तोडण्याचा इशारा दिला असल्याचे सांगितले जात आहे. राणे यांनी मात्र अद्यापी आपला निर्णय जाहीर न केल्याने राणे आता काय करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Comment