छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांची विपर्यस्त आणि संताप यावा अशी छायाचित्रे कोणीतरी फेसबुकवर टाकली आणि राज्यात त्याची अतीशय गंभीर स्वरूपाची प्रतिक्रिया उमटली. या प्रतिक्रियेने अनेक नवे आणि जुने प्रश्न निर्माण होऊन समोर उभे राहिले आहेत. या छायाचित्रांमुळे या दोन महापुरुषांच्या चाहत्यांचा राग अनावर झाला आहे. तसे पाहता ही दोन्ही मराठी आणि त्यातल्या त्यात हिंदुत्ववादी जनतेची दैवते आहेत. त्यांचा अपमान कोणीच सहन करीत नाही. बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांसाठी दैवत आहेत आणि शिवाजी महाराज हे तर सर्वांचेच दैवत आहेत. निश्चितपणे असे म्हणता येते की फेसबुकवर त्यांची विपरित छायाचित्रे प्रसिध्द करणे अनुचित आहे. फेसबुकचा वापर करून कोणाचीही विपरित छायाचित्रे प्रसिध्द होऊच नयेत. त्यामुळे त्यांच्या अनुयायांच्या, चाहत्यांच्या भावनांना गंभीर धक्का बसतो. मात्र तो धक्का गंभीर आहे म्हणून त्यांचे अनुयायी म्हणवून घेणार्यांना कोणालाही आरोपी ठरवून त्याची हत्या करण्याचा अधिकार मिळत नाही हेही लक्षात ठेवले पाहिजे.
संताप साहजिक आहे पण…
फेसबुकवर विपरित चित्र टाकणे हे चूक आहे पण आपण त्यासाठी ज्याला शिक्षा करत आहोत तो खरोखरच गुन्हेगार आहे की नाही याची शहानिशा केली गेली पाहिजे आणि निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. परंतु पुण्यामध्ये अशा रितीने कार्यरत असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेने आपल्या भावना दुखावल्या म्हणून आरोपी कोण हे ठरवण्याचा अधिकार आपल्या हाती घेतला आणि त्याला शिक्षाही करून टाकली. अपमान कितीही घोर असला तरीही त्याबाबत गुन्हेगार कोण हे ठरवणारी यंत्रणाच कामाला लागली पाहिजे. याच कारणाने सध्या हिंदू राष्ट्र सेना हा वादाचा आणि चर्चेचा विषय झाला आहे. हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख म्हणून धनंजय देसाई याचे नाव घेतले जात आहे. या पूर्वी प्रक्षोभक विधाने करणे आणि प्रक्षोभक पत्रके वाटणे या गुन्ह्यासाठी त्याच्यावर फिर्याद दाखल झालेली होती. परंतु त्याच्यावर खटला चालला नाही आणि त्यामुळे तो मोकाट सुटला. हिंदू राष्ट्र सेना ही काही फार मोठी संघटना नाही. केवळ मुस्लिमांविषयी समाजात द्वेष निर्माण करणे एवढ्याच एका हेतूने पेटलेेले काही तरुण हिंदू राष्ट्र सेना म्हणवत असतात. तेव्हा अशा प्रकारच्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. अशा कारवाईमध्ये प्रथमतः संघटनेवर बंदी घातली जाते. ती एक प्रभावी कारवाई ठरते. परंतु बंदी घालण्याची प्रक्रिया फार किचकट आहे.
ज्या संघटनेवर बंदी घालायची असते तिला तिच्या कारवायांचा साद्यंत अहवाल राज्य सरकारला तयार करावा लागतो. कारण कायदा आणि सुव्यवस्था हा राज्य सरकारचा विषय असतो आणि बंदी घालणे हा केंद्राचा विषय असतो. आता हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घालण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकारने या संबंधात राज्य सरकारकडे अहवाल मागितला आहे आणि तो योग्य वाटल्यास केंद्र सरकार हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घालणार आहे. दरम्यानच्या काळात राज्य सरकार योग्य तो अहवाल तयार करत आहे. यापूर्वी अशा कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र संघटनेवर बंदी आली तरी तेच कार्यकर्ते वेगळ्या नावाने कार्यरत राहतात. म्हणजे कारवाया चालूच राहतात. तरुण भावनाशील मुलांची मने भडकवण्याचा उपद्व्याप सुरूच राहतो. अशा प्रकरणामध्ये मुलभूत उपाययोजना झाली पाहिजे. कोणाच्या भावना कितीही दुखावल्या असल्या तरी अपराधी शोधून काढून त्याला अपराध सिध्द झाल्यानंतरच कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. समाजातील अशा लोकांचा बंदोबस्त करण्याचा हाच वैध मार्ग असतो हे अशा संघटनांना समजावून सांगितले पाहिजे. कितीही भावना दुखावल्या तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही आणि नसतो. हे लोकशाहीतले मूलतत्त्व आहे.
अन्यथा कोणीही भावना दुखावल्याचे नाव सांगून आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे कोणालाही शिक्षा करत सुटतील. एकंदरीत या फेसबुकच्या प्रकरणात समाजातील शिकावे असे बरेच काही घडले आहे. हिंदू राष्ट्र संघटनेच्या ज्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षाही झाल्या पाहिजेत. सध्या केन्द्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारच्या कार्यकाळात अशा हिंदुत्ववादी संघटना फार मनमानी करतील असे भाजपाच्या हातात सत्ता येण्याच्या आधीपासूनच सांगितले जात आहे. त्यामुळे या संघटनेच्या कार्यकर्त्यांना मोकाट सोडल्याने या सरकारची बदनामी केली जाणार आहे. किंबहुना ती सुरूही झाली आहे. काही लोक तसा प्रचारही करायला लागतील पण हा प्रश्न मुळात भारतीय जनता पार्टी आणि केन्द्रातले तिचे सरकार यांचा नाही. तो महाराष्ट्रातल्या सेक्युलर सरकारचा आहे. नाहीतर या प्रश्नावरून पक्षीय राजकारण वाढल्याशिवाय राहणार नाही. हिंदू राष्ट्रसेनेच्या नेत्याला राज्य सरकारने मोकाट सोडले आहे. राज्यातले सरकार कॉंग्रेसचे आहे म्हणून बरें आहे. ते भाजपाचे असते तर सार्या कथित सेक्युलर पक्षांनी भारतीय जनता पार्टीवर अनेक आरोप केले असते.