मुंबई – भाजपचे दिवंगत नेते आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करावी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून मुंडे यांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्रातील जनतेसह राज्यातील नेत्यांनाही जबरदस्त धक्का बसला आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी मुंडेंच्या अकाली मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करीत आहेत.असे पवार यांनी पत्रात म्हटले असून सीबीआय चौकशीच्या मागणीचे समर्थन केले आहे.
पवारांचे मोदींना पत्र; मुंडेंचा अपघात, सीबीआय चौकशी हवीच
पवार यांनी पंतप्रधान मोदींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंडे हे एक मोठे नेते होते. ते फक्त भाजपचेच नेते नव्हते तर महाराष्ट्राचे लोकनेते होते. मुंडेंच्या मृत्यूबाबत लोकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. प्रदेश भाजप- शिवसेनेनेही याबाबत मागणी केली आहे. त्यांच्या मागणीला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे.तसेच खरी वस्तुस्थिती काय आहे ,हे समोर येईल आणि कार्यकर्त्यांच्या भावना शांत होतील.
मुंडे यांच्या मृत्यूबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्याआधी प्रदेश भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मुंडेंच्या अपघाती मृत्यूबाबत शंका उपस्थित केली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या वतीने अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. प्रदेश भाजप, शिवसेना, आरपीआयचे रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर या सर्वच महायुतीतील घटकपक्षांनी अपघाताची चौकशीची मागणी केली आहे. त्यात आता राष्ट्रवादीनेही मागणी केली आहे.