
पुणे – मान्सूनच्या वाटचालीत आता कोणताही अडथळा नाही ,असे हवामान खात्याने स्पष्ट केले आज केरळमध्ये नैऋत्य मोसमी वारे दाखल होतील, असा अंदाज वर्तवला आहे. केरळात मान्सून दाखल होण्याची १ जूनची तारीख जरी चुकली असली तरीही हवामान खात्याने अगोदरच वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे ५ जूनलाच केरळात नैऋत्य मोसमी वारे दाखल होणार, असे नमूद केले आहे.
मान्सूनच्या वाटचालीत अडथळा नाही
येत्या ४८ तासांत केरळ, दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव-कॉमोरिनचा काही भाग व बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मान्सून दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण असून मान्सूनची गेल्या दोन दिवसांपासूनची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे . मान्सूनच्या मार्गात कोणताही अडथळा नसल्याने ५ तारखेलाच मान्सून केरळात दाखल होईल. दरम्यान कर्नाटक ते केरळपर्यंत निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) हा सामान्यत: मान्सून काळात तयार होतो. केरळावर मोठय़ा प्रमाणात ढग तयार झाले असून तेथे अगोदरच पाऊस सुरू आहे. ही परिस्थिती पाहता येत्या २४ तासांत केरळात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती पुणे हवामान खात्यामधील सूत्रांनी दिली आहे.
