असंतोषाला वाचा फुटतेय

congress
कॉंग्रेस पक्षात आत्मपरीक्षण सुरू आहे पण त्या आत्मपरीक्षणातून नवे काय निष्पन्न झाले याला फार महत्त्व असते. केवळ आत्मपरीक्षण केले आणि कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क वाढवणे आवश्यक असल्याचे सर्वांच्या लक्षात येणे पुरेसे नाही. त्या अनुरोधाने कारवाई काय झाली, जनतेशी संपर्क वाढवणार्‍या काही यंत्रणा निर्माण झाल्या का हे पाहणे आवश्यक आहे. तसे काही झाले नसेल तर आत्मपरीक्षण व्यर्थच ठरते. कॉंग्रेस पक्षाला ही गोष्ट अनेक दिवसांपासून जाणवत आहे पण, संपर्क वाढवण्याचे काहीही प्रयत्न झाले नाहीत आणि त्यामुळे पक्षाची पराभव परंपरा सुरू झाली. आता तर परमावधी झाली पण आता आत्मपरीक्षणही म्हणावे तेवढे मोकळेपणाने होत नाही. पक्षात लोकशाही असल्याचा दावा केला जातो पण आत्म परीक्षणाच्या बाबतीत मोकळेपणा नाही आणि प्रांजळपणाही नाही. आत्मचिंतनाच्या निमित्ताने सुद्धा पक्षात हुकुमशाहीचे दर्शन घडत आहे. पराभवाच्या खर्‍या कारणावर कोणी स्पष्टपणे बोलत नाही. कारण खरे बोलल्यास आपल्याला पक्षातून काढून टाकतील अशी भीती वाटत रहाते. परिणामी मनातली खदखद मनातच राहते. ती मनात तशीच ठेवली तर पक्षाच्या पराभवाची खरी कारणे कधीच समोर येणार नाहीत आणि पक्ष पुन्हा पराभवाच्या खाईत लोटला जाईल हेही काही लोकांना कळते.

पण सोनिया आणि राहुल गांधी यांच्यामुळेच पराभव झाला आहे असे म्हणण्याची हिंमत कोण करणार? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ? शेवटी गेल्या दोन दिवसात काही नेत्यांनी मनातल्या अस्वस्थतेची वाच्यता करायला सुरूवात केली आहे. केरळातले नेते एम. ए. मुस्तफा यांनी राहुल गांधी यांना जोकर म्हटले. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. ते राजीनामा देत नसतील तर त्यांना पक्षातून बडतर्फ करावे असे ते म्हणाले. या प्रतिपादनामुळे खळबळ माजली आणि मुस्तफा यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. खरे तर पक्षात लोकशाही असायला हवी. कोणी आपले मत मांडले म्हणून त्याला पक्षातून काढून टाकणे अनुचित आहे. या निलंबनाचा अर्थ असा आहे की, पक्षाचा पराभव झ्राल्यानंतर पराभवाचे विश्‍लेषण करताना ते पक्षश्रेष्ठींना विचारून करावे. पक्षश्रेष्ठी मांडतात तसेच विश्‍लेषण न मांडल्यास पक्षातून काढून टाकले जाईल. मुस्तफा यांनी राहुल गांधी यांना जोकर म्हटले आणि राजस्थानातल्या एका आमदाराने त्यांना जोकरांचे व्यवस्थापक म्हटले. भवरलाल शर्मा असे त्यांचे नाव आहे. या दोघांनीही आपण राहुल गांधी यांना जोकर का म्हणत आहोत याची मीमांसा केली होती.

त्यांच्या या प्रतिपादनावर उलट सुलट विचार करून, त्यांना पुन्हा आपले म्हणणे नीट मांडण्याची संधी द्यायला हवी होती. ते म्हणण न पटल्यास त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. याचा अर्थ असा की विश्‍लेषण करण्याबाबत कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य नाही. हुकूमशाही प्रवृत्ती मानणार्‍या साम्यवादी पक्षांत हीच रीत असते. गेल्या दोन दिवसांत या दोघांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले आणि आता बिहारातल्या एका मुस्लिम नेत्याने सोनिया गांधी यांच्या काही निर्णयावर प्रश्‍नचिन्ह उभे करून पक्षात आता काय होणार आहे याची एक झलक दाखवली आहे. या प्रयत्नाने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोनिया गांधी यांना लोकसभा निवडणुकीतला पराभव दिसायला लागला तेव्हा दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम बुखारी यांची भेट घेतली. पण या भेटीने मुस्लिमांचीही मते मिळाली नाहीत आणि त्यामुळे चिडलेल्या हिंदूंनीही कॉंग्रेसच्या मुस्लिम अनुनयाची चीड येऊन कॉंग्रेसला मते दिली. त्यामुळे सोनयिा गांधी यांची ही भेट घेण्याची खेळी चूक ठरली असे त्या मुस्लिम नेत्याने म्हटले आहे. ही गोष्टही पूर्ण सत्य आहे. कारण सोनिया गांधी यांनी त्या आशेनेच बुखारींची भेट घेतली होती. २००४ साली त्यांनी आठ वर्षांनंतर कॉंग्रेसला सत्ता मिळवून दिली हेच त्यांचे पक्षातले क्वालिफिकेशन होते. त्यामुळेच कॉंग्रेसचे नेते त्यांना मानत होते.

सोनिया गांधी यांना या गोष्टीची जाणीव असल्याने त्या सातत्याने पुन्हा कॉंगे्रसलाच सत्ता कशी मिळेल यावर भर देऊनच काही निर्णय घेत होत्या. त्यांच्या राजकारणाचे तेच एक मोठे सूत्र होते.सोनिया गांधी यांना परंपरेने एक गोष्ट कळली होती की, गरिबांना परोपकारी योजना दिल्या की गरीब मतदार आपल्या पदरात भरपूर मते टाकतात आणि मुस्लिमांना सतत काही का काही सवलती देण्याचे आश्‍वासन देत राहिले की हाही समाज कॉंग्रेसला हमखास मते देतो. या एका हेतूने त्यांनी आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी अल्पसंख्यकांच्या नावाचा अगदी घोष लावला होता. त्यानें मुस्लिम समाजावर प्रभाव पडून आपली निवडणूक सोपी होईल अशी त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे त्या सतत मुस्लिमांच्या कल्याणाच्या गोष्टी बोलत राहिल्या. त्याचा मुस्लिमांवर तर काही प्रभाव पडलाच नाही पण हिंदू समाजात मात्र त्याची प्रतिक्रिया उमटली. एकुणात दोन्ही समाजाची मते गेली. हे विश्‍लेषण एका कॉंग्रेस खासदाराने स्पष्टपणे मांडले आहे. मुस्लिम समाज म्हणजे या देशातला कोणी तरी स्पेशल समाज आहे असा आपण त्याचा अनुनय करत राहिलो. त्याची हिंदू समाजात उमटलेली प्रतिक्रिया कॉंग्रेसला महागात पडली. आता हेच माप एका मुुस्लिम नेत्याने सोनिया गांधी यांच्या पदरात टाकले आहे.

Leave a Comment