परळी – भारताचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे अमर रहे, साहेब परत या, मुंडे साहेब अमर रहे, अशा घोषणा, जवळपास ६ लाखांचा शोकाकुल जनसमुदाय यांच्या साक्षीने महाराष्ट्राच्या झुंजार नेत्याला,बहुजनांच्या नायकाला त्यांच्या कन्येने मुखाग्नी दिला. मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे-पालवे यांनी दुपारी पावणे दोनच्या सुमारास पार्थिवाला मुखाग्नी दिला. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या प्रांगणावर लोटला . बुधवारी पावणे बाराच्या सुमारास हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने मुंडे यांचे पार्थिव लातूरहून परळीला आणण्यात आले. पार्थिव हेलिकॉप्टरवरून फुलांनी सजविलेल्या गाडीवर ठेवण्यात आल्यानंतर लोकांनी त्याभोवती गर्दी केली. अमर रहे… अमर रहे… मुंडेसाहेब अमर रहे…, परत या… परत या… मुंडेसाहेब परत या… अशा घोषणा यावेळी जनसमुदायातून देण्यात येत होत्या. पार्थिव गाडीतून व्यासपीठावर ठेवण्यात आल्यावरही अनेकांनी अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली. गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पंकजा मुंडे या स्वतः कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत होत्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी हेसुद्धा कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत होते.
बहुजनांचा नायक अनंतात विलीन
मुंडे यांच्या अंत्यविधीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले ,मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ,राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ,हर्षवर्धन पाटील यांच्यासह विविध पक्षांचे राज्यातील नेते उपस्थित होते . संपूर्ण बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागांतून अनेक लोक मुंडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी येथे आले आहेत.सकाळी हवाई दलाच्या विशेष विमानाने मुंबईहून लातूर येथे आणण्यात आले. मुंडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लातूरकरांनी यावेळी विमानतळाबाहेर गर्दी केली होती. मुंडे यांचे पार्थिव विमानतळावरून हैलिकॉप्टरने लगेचच परळीला नेण्यात येणार होते. मात्र, असंख्य कार्यकर्त्यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे थोड्यावेळासाठी पार्थिव विमानतळाबाहेर आणण्यात आले. तेथे तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावर पार्थिव ठेवण्यात आले आणि लातूरकरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.या लोकनेत्याच्या अंत्य दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांला आपण पोरके झाल्याच्या भावनेने गलबलून आले आहे.