चौकशी झालीच पाहिजे

munde
भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ेअंत्यविधीला जमलेला जनसमुदाय आणि त्याची वागणूक हा एक मोठा जिज्ञासेचा विषय ठरणार आहे. कारण या जनसमुदायाने आपल्या वर्तनातून आणि देहबोलीतून जी भावना व्यक्त केली तिच्यातून मुंडेंच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे ही भावना व्यक्त झाली अणि ती तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांना स्वीकारावी लागली. आता केंद्र सरकारला सार्‍या गोष्टींची बारकाईने चौकशी करावी लागणार आहे. मंत्र्यांची सुरक्षितता, गोपीनाथराव यांचे लवाजमा आणि सुरक्षा व्यवस्था न घेता विमानतळावर जाणे, त्यांच्या गाडीवर दुसरी गाडी आदळण्याची पध्दत, तिथून त्यांच्यावर झालेले उपचार आणि उपचारात काही कमतरता राहिली असेल तर ती कमतरता या सर्वांची चौकशी व्हावी लागेल. जनसमुदायाने परळीमध्ये त्या विशिष्ट परिस्थितीत ही मागणी केली आणि तिथला त्या जनसमुदायाचा राग तिथेच निवळला, आता चौकशीची गरज नाही असा विचार सरकार करेल तर ती फार मोठी चूक ठरेल. गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यविधीला ५ ते ६ लाखांपेक्षा अधिक लोक उपस्थित होते. महाराष्ट्रात आजवर अनेक नेते गेले पण काल परळीत जो आक्रोश दिसला तसा आजवर कधी पाहिलेला नाही. हा प्रकारच मोठा अभूतपूर्व होता.

अनेक तरुण मुले आणि महिला आपल्या घरातला कोणीतरी कर्ता पुरुष गेला आहे अशा भावनेने ओक्साबोक्सी रडताना दिसत होते. नेत्यांविषयी लोकांच्या मनात आदर असतो, प्रेम असते, आपुलकीही असते परंतु मुंडेंच्या अनुयायांनी व्यक्त केलेला आक्रोश त्यांच्याविषयी असलेल्या एका वेगळ्या भावनेचा द्योतक होता. तो त्यांचा समर्थक वर्ग आणि मुंडे यांच्यामध्ये असे काय नाते होते की ज्यामुळे लोकांना मुंडेंच्या जाण्याने एवढे दुःख व्हावे? या जनसमुदायाला आधी तर धक्का बसला होता. कारण गोपीनाथ मुंडे यांचे निधन अपघाती आणि तडकाफडकी झालेले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात ते झाले होते. त्यांच्या हजारो चाहत्यांनी परळीमध्ये त्यांचा प्रचंड मोठा सत्कार करायचे ठरवले होते. त्यासाठी मोठे व्यासपीठ निर्माण केले होते. प्रचंड फुले आणून ठेवलेली होती. पण या व्यासपीठाचा उपयोग त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी करावा लागेल आणि त्यांच्यासाठी आणलेली फुले त्यांच्या पार्थिव देहावर वाहून त्यांना शेवटचा निरोप द्यावा लागेल याची या जनसमुदायाला तीळमात्र कल्पना नव्हती. पण हे नशिबाने घडले आणि त्याचा धक्का या लोकांना बसला.

एका ठिकाणी निर्जिव अवस्थेत पडलेले गोपीनाथ मुंडे हे या लोकांनी कधी कल्पिले नव्हते. गोपीनाथ मुंडे म्हणजे झंझावात. सतत वाहणारा, घोंगावणारा आणि नवनवी आव्हाने निर्माण करून ती झेलणारा, परतवून लावणारा असा हा झंझावात लोकांनी चाळीस वर्षे पाहिला होता. प्रचंड मोठी सभा जमलेली. गोपीनाथ मुंडे त्यांच्या आवडत्या गाडीतून किंवा हेलिकॉप्टरमधून उतरलेले आणि झपझप पावले टाकत व्यासपीठाकडे चाललेले, चालता चालता खिशातला कंगवा काढून केस विंचरणारे असेच मुंडे लोकांना माहीत होते. तो झंझावात आता पहायला मिळणार नाही आणि हे संकट अनपेक्षितपणे कोसळलेले आहे. ही गोष्ट हा जमाव आणि त्यांचे अनुयायी सहन करू शकले नाहीत. म्हणून शेवटी का होईना परंतु त्यांचा चेहरा बघायला मिळावा अशी प्रत्येकाची धडपड चाललेली होती. त्यात पोलिसांचा अडथळा येताच त्यांच्यावर दगडफेक करायला सुध्दा त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. लोक असे बेशिस्त का वागले? त्यांना अंत्यविधीचे गांभिर्य का राखता आले नाी असा प्रश्‍न कदाचित अनेक शहरी लोकांच्या मनात निर्माणही झाला असेल पण लोकांच्या भावना ज्यांना बारकाईने कळतात असे लोक निश्‍चितच अशी ग्वाही देतील की हे लोक केवळ दुःखी नव्हते. त्यांना केवळ धक्का बसलेला नव्हता तर त्यांच्या मनामध्ये उद्वेग साठलेला होता.

आपल्या लाडक्या नेत्याचा बळी एका व्यवस्थेने घेतलेला आहे अशी शंका त्यांच्या मनात होती. गोपीनाथ मुंडे यांचा अपघात हा घातपात नव्हे याची ग्वाही काल सायंकाळी दिली गेली होती आणि तिथंपर्यंत तरी त्यांच्या मृत्यूच्या कारणाची चौकशी करण्याची गरज नाही, असे स्पष्ट झाले होते. परंतु त्यंाच्या उद्वेगग्रस्त अनुयायांनी ही ग्वाही मानली नाही. तिथे आलेल्या हजारो लोकांनी नकळतपणे एक भावना व्यक्त केली. आमच्या नेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, ही ती भावना होती. या अंत्यविधीला आलेल्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांना मुंडेंच्या अनुयायांनी घेराव केला. त्यामागची भावना चौकशी करावी हीच होती. ही भावना व्यक्त करणारा कोणी नेता नव्हता. लोकच आपल्या चेहर्‍यातून ते बोलत होते. त्यामुळे या नेत्याला चौकशी होईल असे आश्‍वासन द्यावे लागले. लोकांच्या मनातला हा उद्रेक आणि त्यापोटी होणारी त्यांची काहीशी हुल्लडबाजी हिचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली. त्यांनी जनतेची ही भावना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल, असे जाहीर केले. तेव्हा हा उद्रेक थोडा कमी झाला. सरकारला आता याचा विचार करावाच लागणार आहे.

Leave a Comment