काँग्रेसला काडीमोड देऊन राणेंचा भाजपशी घरोबा?

rane
मुंबई – लोकसभा निवडणुकात काँग्रेसचा झालेला दारूण पराभव आणि त्यातही कोकणातील बालेकिल्यात मुलाला पत्करावे लागलेले अपयश यामुळे अस्वस्थ असलेल्या उद्योगमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला काडीमोड देण्याचा निर्णय घेतला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. या संबंधीची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसांत अपेक्षित आहे. राणे काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपच्या घरात शिरण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जात आहे.

मुलगा निलेश याचे अपयश राणे यांना चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यात काँग्रेसमधील वरीष्ठ नेत्यांकडून सहन करावी लागत असलेली उपेक्षा अधिक भर घालते आहे. यातूनच राणे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक वेळा नाराजी व्यक्त केली होती मात्र त्याची दखल घेतली गेलेली नाही.यामुळेच त्यांनी कॅबिनेटच्या बैठकांना दांडी मारली होती आणि काल प्रथमच हजेरी लावलेली बैठक आर.आर. पाटील यांच्याबरोबर झालेल्या वादाने अर्धवट सोडून दिली होती असे समजते. काँग्रेसच्या दारूण पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरताना त्यांनी राष्ट्रवादीच्या लोकांनी काँग्रेस विरोधात काम केल्याचा आरोपही केला होता.

मुलाच्या पराभवानंतर राणे यांनी दिलेला मंत्रीपदाचा राजीनामा फेटाळला गेला होता. मात्र आपल्या क्षमतेचा वापर काँग्रेसकडून यथायोग्य केला जात नाही असा शोध राणे यांना लागला आहे. सेना सोडून २००५ मध्ये काँग्रेसमध्ये आलेल्या राणे यांना मुख्यमंत्रीपदाचे आमीष दाखविले गेले होते मात्र तेही पाळले गेले नव्हते. या सर्व बाबींमुळे नाराज राणे आता काँग्रेसचा त्याग करण्याच्या विचारात आहेत.

दिल्ली भेटीत राणे यांनी भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या असल्याचेही समजते. मात्र भाजप त्यांच्याबाबत वेट अॅन्ड वॉचचे धोरण अवलंबित आहे. सेनेने मुख्यमंत्रीपदासाठीचा हट्ट कायम ठेवला तर राणे यांच्या रूपाने सेनेला उत्तर देण्याचा विचार भाजप नेते करत आहेत असेही समजते.

Leave a Comment