स्व. गोपीनाथ मुंडे यांची कारकीर्द वयाच्या १४व्या वर्षी पंढरीची वारी …

munde2
पुणे – लोकनेते आणि भाजपचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नाथ्रा या गावी [ता. परळी, जि. बीड] एका सामान्य शेतकरी कुटुंबात १२ डिसेंबर, १९४९ रोजी वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडे यांच्या घरी झाला. मुंडे कुटुंब पंढरपूरच्या वारीत अनेक वर्षे सहभागी होते. अखंड वारी करणारे वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडेंच्या प्रभावाने गोपीनाथ मुंडे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी पंढरपूरची वारी चालत जाऊन केली. त्यानंतर सात वर्षे वारी केली. मराठवाड्यात त्या वेळी श्रीक्षेत्र भगवानगडचे महंत श्री संत भगवानबाबा गडकर महाराज यांच्या आध्यात्म्याचा बोलबाला होता. आई-वडील भगवानबाबांचे कीर्तन ऐकण्यास गोपीनाथलाही घेऊन जात. हे सर्व ऐकून मुंडेंच्या मनावर आध्यात्मिक परिणाम झाला.

त्यांच्या घरात बेताची परिस्थिती होती. १९६९ मध्ये पांडुरंगरावांचे अकाली निधन झाले, पण त्यांच्या आई व गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू पंडितअण्णा मुंडेने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. भाऊ पंडितअण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण पूर्ण केले. गोपीनाथ मुंडे यांचे धाकटे भाऊ व्यंकट मुंडे हे आहेत. २१ मे, १९७८ला त्यांचे लग्न प्रमोद महाजनांच्या भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी आंबेजोगाईला झाले. गोपीनाथ मुंडे यांना पंकजा पालवे-मुंडे, प्रीतम मते-मुंडे आणि यशश्री मुंडे या तीन मुली आहेत.

राजकीय कारकिर्द -प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन या दोघांनी झंझावाती प्रचाराने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता. आधी जनसंघ आणि नंतर भाजपचा प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रूजविली होती. मुंडे-महाजन जोडगोळीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला होता. जनसंघाच्या मिणमिणत्या पणतीपासून भाजपला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे मोठे काम मुंडे-महाजन या जोडगोळीने केले. संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर निघून पक्षाला सर्वसमावेशक आणि देशव्यापी स्वरूप देण्यासाठी वसंतराव भागवतांनी या जोडगोळीला बळ दिले. एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी मराठवाड्यामध्ये एक सक्षम पर्याय निर्माण केला. सुरुवातीपासून मतदारसंघावर लक्ष ठेवावं असं प्रमोद महाजनांचं म्हणणं होतं. त्यामुळे मुंडेचे लक्ष नेहमीच मराठवाडा आणि विशेषत: मतदारसंघावर असायचे. वयाच्या ऐन पंचविशीत १९७० मध्ये परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ.भा.वि.प.) काम करीत असतानाच ते संघाच्या संपर्कात आले. त्यांचे कर्तृत्व बहरू लागले. अशातच मुंडेच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९७८ साली बीड जिल्ह्यातून निवडणूक लढवून झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.

१९७८मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले.

Leave a Comment