मुंडे नावाचे वादळ शमले

munde
भाजपा नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाची बातमी एखादा वज्राघात व्हावा त्याप्रमाणे येऊन कोसळली आणि मन सुन्न झाले. गोपीनाथ मुंडे म्हणजे सतत प्रचंड वेगाने घोंगावणारा झंझावात. मुंडे यांना आपण पाहिले ते महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यात फिरताना. त्यांना निपचित पडलेले पाहून भल्याभल्यांना अश्रू आवरले नाहीत. एखाद्या सामान्य कुटुंबात जन्माला येऊन एवढा मोठा नेता होणे ही सामान्य गोष्ट नाही. गेल्या २५ वर्षांपासून गोपीनाथ मुंडे हे शरद पवारांच्या विरुध्द सातत्याने राजकारण करत राहिले. मुंडे साहेबांच्या निधनाचे वृत्त श्री. पवार यांना कळले त्यावेळेस ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे वॉज डायनॅमिक मास लिडर. या दोन शब्दांमध्ये शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांचे चरित्र उभे केले आहे. आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून असा गौरव होण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांना आपल्या आयुष्यामध्ये किती खस्ता खाव्या लागल्या आहेत, किती संघर्ष करावा लागला आहे, किती दगदग सहन करावी लागली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कितीतरी कठीण अशा मानसिक व्यग्रतेतून आणि चढउतारातून जावे लागले आहे. याची आपण कल्पनासुध्दा करू शकत नाही.

गोपीनाथ मुंडे नावाची ही गाथा इतिहासात खास नोंद करावी अशी आहे. आंबेजोगाई तालुक्यातले नाथरा हे त्यांचे गाव. १९७० च्या सुमारास आंबेजोगाई येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य करायला लागले. १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळामुळे गरिबी आणि दैन्य काय असते याचे दर्शन त्यांना घडले आणि आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी जनसंघाचा कार्यकर्ता म्हणून कामास प्रारंभ केला. छोट्या मोठ्या कारणावरून प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे मोर्चे काढत राहिले आणि बघता बघता तरुण नेते म्हणून उदयास आले. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले नशिब आजमावून पाहिले आणि ते आमदार झाले. या काळात त्यांच्यावर अनेक दुर्धर प्रसंग आले. परंतु प्रमोद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ते त्यातून सहीसलामत सुटत गेेले. तत्पूर्वी १९७५ साली त्यांनी आणीबाणीकालीन कारावास सोसलेला होता आणि १९७३ च्या मराठवाडा विकास आंदोलनात हिरीरीने भाग घेतला होता. मात्र या सहभागातून आपण मोठे नेते होऊ अशी त्यांचीही कल्पना नव्हती. १९८० साली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

१९८० ते ९२ या कालावधीत ते उगवते नेते, धडपडे आमदार म्हणून सर्वांना ज्ञात होत गेले. मात्र १९९२ साली ते विधानसभेतले विरोधी पक्षनेते झाले आणि त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विरुध्द दंड थोपटले. १९८९ च्या सुमारास त्यांच्या वयाच्या चाळीशीच्या आतच त्यांना महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे राजकीय गुरु वसंतराव भागवत यांनी त्यांना महाराष्ट्रात मोठा दौरा काढण्याचा सल्ला दिला होता. राज्यात काहीतरी निमित्त करून ७ हजार जाहीर सभाा घ्या, असे म्हणून भागवतांनी त्यांच्या जाहीर सभांचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंडे यांनी हा सल्ला मानला आणि बघता बघता ते महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळखले जायला लागले. १९९२ साली विरोधी पक्षनेते झाल्याने ते राज्याचे शरद पवार यांचे पर्यायी नेते म्हणून ओळखले जायला लागले. ९२ ते ९५ हा त्यांच्या आयुष्यातला अतीशय संघर्षाचा होता. त्यांनी पवारांच्या विरुध्द राज्यात प्रचाराचा एवढा झंझावात निर्माण केला की ९५ साली भाजपा-सेना युतीचे सरकार सत्तेत आले आणि गोपीनाथ मुंडे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री झाले.

या अधिकारात गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईतले गँगवार बंद करून दाखवले. त्यांच्या आदेशाने पोलिसांनी अनेक गुंडाना यमसदनाला पाठविले. काही गुंडांनी मुंडे यांना सातत्याने धमक्या द्यायला सुरूवात केली. त्यावेळी मुंडे यांच्याजागी दुसरा कोणी असता तर डगमगला असता. परंतु मुंडे डगमगले तर नाहीतच पण कदाचित या गुंडांनी आपला बळी घेतला तर काय करणार याची सारी तयारी करून ठेवली. आपल्या पश्‍चात कुटुंबाची व्यवस्था काय असावी हे लेखी लिहून ठेवले. आपले कर्तव्य करताना प्राण गमवाला लागला तरी हरकत नाही ही भावना त्यामागे होती. २००३ साली महाराष्ट्रातली सत्ता हातून गेली आणि २००६ साली प्रमोद महाजन यांची हत्या झाली. पाठोपाठ २ वर्षांनी महाजनांची हत्या करणारा त्यांचा धाकटा भाऊ प्रवीण हाही मरण पावला. मुंडे-महाजन कुटुंबाच्या आयुष्यात हे मोठे सहन होण्यासारखे नव्हते. पण गोपीनाथ मुंडे यांनी सर्वांना आधार दिला. असे असले तरी महाजनांच्या रुपाने त्यांचा आधार मात्र गेला होता. महाराष्ट्रातच्या राजकारणात रहावे की केंद्रातल्या राजकारणात रमावे याबाबत त्यांचा निर्णय पक्का झाला नाही. आपले खच्चीकरण करण्याचे प्रयत्न होत आहेत याची जाणीव त्यांना सतत होत राहिली. सतत दोन निवडणुकांमध्ये पराभव झाला तरी महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य टिकवण्याचे मोठे काम गोपीनाथ मुुंडे यांनी केले.

राजकारण म्हटले की डावपेच आलेच. भारतीय जनता पार्टीचा विस्तार वाढविण्यासाठी या सगळ्या गोष्टी करण्याची ताकद भाजपामध्ये केवळ मुंडे यांच्याकडे होती. अन्य पक्षातले कितीतरी मोठे नेते मुंडे यांनीच भाजपामध्ये आणले. पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपाला स्थान नाही असे सातत्याने म्हटले जात होते. परंतु गोपीनाथ मुंडे यांच्याच प्रयत्नातून सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये भाजपाचे हातपाय पसरले गेले. मराठवाड्यात तर मुंडे यांच्या झंझावाताला तुलना नव्हती. एकदा आपण भाजपाचे कर्तेकरवते आहोत याची जाणीव झाली की मुंडेंनी गांभिर्याने महाराष्ट्राचा नेता म्हणून काम करायला सुरूवात केली. महाराष्ट्राच्या कोणत्याही प्रश्‍नामध्ये आपण अग्रभागी असले पाहिजे असा त्यांचा अट्टाहास होता. त्यासाठी कौटुंबिक जीवनातल्या अडचणी सहन करून सुध्दा ते अडवा उभा महाराष्ट्र पायाखाली घालत राहिले. असा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा हे भाजपा नेत्यांचे स्वप्न होते. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा-सेना युतीला त्यांनी अभूतपूर्व यश मिळवून दिले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणवल्या जाणार्‍या महाराष्ट्रात महायुती करून ४२ जागा मिळवून दाखवल्या. त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले. असे असले तरी त्यांच्या मनात महाराष्ट्रच होता आणि म्हणूनच ते आज मुंबईला यायला निघाले होते. पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता.

Leave a Comment