लाचार मुख्यमंत्र्यांच्या चहापाण्यात आम्हाला रस नाही – खडसे

khadse
मुंबई – मंत्रीमंडळाचा विस्तार करणेही या लोकांच्या हातात नाही. अशा निगरगट्ट सरकारच्या चहापाण्यात आम्हाला रस नाही असे स्पष्ट करीत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला.

उद्यापासून राज्यात पावसाळी अधिवेशन होत असून विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन आहे. सत्ताधारी आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक सरसावले आहेत.रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. विरोधकांनी नेहमी प्रमाणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यानंतर भाजप नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली.यावेळी खडसे म्हणाले, सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेकांशी जमत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कोणीच ऐकत नसून चव्हाण हे आजवरचे सर्वात लाचार व हतबल मुख्यमंत्री आहेत अशी जोरदार टीका त्यांनी केली

सरकारला दलित महिलांवर होणा-या अत्याचाराशी घेणदेणे नाही, राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला जात आहे असा आरोपही खडसे यांनी केला. राज्यात महायुतीला मतदान केल्याने काँग्रेस- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ग्रामीण भागातील जनतेला धमकावत असून त्यांना वीज तोडण्याची धमकीही दिली जात आहे असा दावाही खडसेंनी केला. यंदाच्या अधिवेशनात सिंचन घोटाळ्याचा अहवाल पटलावर यावा यासाठी पाठपुरावा करु असे खडसे यावेळी म्हणाले .

Leave a Comment