कंपन्याच त्यांना एम्पॉयेबल करत आहेत

campus
भारतातली महाविद्यालये म्हणजे पदवीधर तयार करण्याचे कारखाने आहेत. काही कंपन्या या कारखान्यातल्या तयार पदवीधरांतून आपल्याला हवे ते कर्मचारी मिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या पदरात निराशा पडते कारण पदवीधर लाखोंनी आहेत पण ताबडतोब नोकरीवर घ्यावे आणि त्यांच्यावर कामाची जबाबदारी टाकावी अशी मुलेच सापडत नाहीत. हजारो मुलांच्या मुलाखती घेतल्या तर त्यात दहा पाच मुले योग्य सापडतात. ही मोठी दु:खाची बाब आहे पण तिच्यामुळे कंपन्याच अडचणीत यायला लागल्या आहेत.कारण त्यांना योग्य कर्मचार्‍यांची चणचण भासत आहे आणि त्यांना आपल्या उद्योगाचा विस्तार करण्याच्या योजना बासनात गुंडाळून ठेवाव्या लागत आहेत. धंदा आहे, भांडवल आहे, जागा आहे, मागणी आहे पण माणसे मिळत नाहीत म्हणून विस्ताराची योजना मागे ठेवावी लागत आहे. ही परिस्थिती माहिती तंत्रज्ञान आणि औषधी कंपन्यांना अधिक जाणवत आहे.

यातून मार्ग कसा काढावा यावर काही कंपन्यांनी विचार केला आहे. मुलाखतींना आलेल्या मुला मुलींत दोष आढळले तरीही त्यांना नोकरीवर घेतले जात आहे आणि त्यांना कंपनीचा खर्च करून नोकरी करण्यास योग्य बनवले जात आहे. लुपीन कंपनीने अशी एक प्रशिक्षण संस्थाच सुरू केली आहे. लोणावळा येथे असलेल्या अशा एक संस्थेत सध्या दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना सॉफ्ट स्किल्स तर शिकवले जात आहेतच पण नोकरी करण्यासाठी आवश्यक असे तांत्रिक ज्ञानही दिले जात आहे. म्हणजे हे दोन महिन्यांचे प्रशिक्षण संपल्याबरोबर तो विद्यार्थी नोकरी करण्यास पात्र ठरतो आणि त्याची नोकरी सुरू होते.

अशा एकेका विद्यार्थ्यावर कंपनी २५ ते ३० हजार रुपये खर्च करत आहे. हा त्या मुलांचा दोन महिन्यांचा पगार आहे. काही कंपन्यांनी असे १५ दिवसांचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. अशीच परिस्थिती आय.टी. कंपन्याचीही आहे. त्यांनीही ङ्ग्रेश पदवीधरांना नोकरीस घेतल्यानंतर आधी हे प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. त्यावर या कंपन्या असाच हजारो रुपये खर्च करीत असतात. एकंदरीत अनुभवी माणसे मिळत नाहीत तर अशा नव्यांनाच अनुभव देऊन मग कामावर घ्यावे अशी ही योजना आहे.

Leave a Comment