रिक्त मंत्रीपदे ;अखेर कॉंग्रेसला मिळाला ‘मुहूर्त ‘

congress
मुंबई – अखेर कॉंग्रेसला रिक्त मंत्रीपदे भरण्यास मुहूर्त मिळाला आहे. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसमधील दोन रिक्त मंत्रिपदे भरण्यात आली . यावेळी अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट तर अमित देशमुख यांना राज्य मंत्रीपदाची शपथ राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी दिली.राज्यात काँग्रेसकडील तीन मंत्रिपदे रिक्त होती. ही पदे भरण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे अनेकदा चर्चा केली. या मंत्रिमंडळ विस्तारासाठी नव्या मंत्र्यांची नावे निश्‍चित होत नसल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. रविवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेतही काहीही ठाम सांगण्यास मुख्यमंत्री तयार नव्हते.

अखेर पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्री चव्हाण यांना तीनपैकी दोन मंत्रिपदे भरण्यासाठी रविवारी रात्री परवानगी दिली. त्यानुसार माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आमदार अमित देशमुख आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या नावाला वरिष्ठांकडून मंजूरी मिळाली.

Leave a Comment