इयत्ता बारावी ;यंदाही मुलींचीच बाजी

hsc
पुणे – राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल 90.03 टक्‍के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकाल दहा टक्‍क्‍यांनी वाढला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून, राज्यात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. यंदाचा बारावीचा निकाल आतापर्यंतचा सर्वाधिक असून, निकालाचा हा नवा उच्चांक आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. बारावी परीक्षेसाठी 12 लाख 549 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 11 लाख 98 हजार 859 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 10 लाख 79 हजार 332 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 5 लाख 78 हजार 332 मुलांचा, तर 5 लाख 1 हजार मुलींचा समावेश आहे. निकालाची एकूण टक्‍केवारी 90.03 इतकी आहे.

गेल्या वर्षी बारावीचा निकाल 79.95 टक्‍के लागला होता. यंदा 90 टक्‍के इतका लागला आहे. यावरून तब्बल 10 टक्‍क्‍यांनी निकाल वाढला आहे. यावर्षी मुलांचे उत्तीर्णाचे प्रमाण 87.23 टक्‍के, तर मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण 93.50 टक्‍के आहे. यंदाही मुलींनी वर्चस्व प्रस्थापित करीत, मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण 6 टक्‍के जास्त आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राज्याच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून, मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. यंदा शाखानिहायमध्ये विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक आहे. पुनर्परीक्षार्थी (रिपीटर) विद्यार्थ्यांचा राज्याचा निकाल 29.45 टक्‍के लागला आहे. बारावी परीक्षेसाठी 1 लाख 31 हजार 452 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 38 हजार 718 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल गेल्या वर्षी 29.47 टक्‍के होता. यंदाचा निकाल गेल्या वर्षीच्या जवळपास लागला आहे.

चौकट :
“80:20′ पॅटर्नमुळे निकालाचा टक्‍का वाढला
यावर्षी प्रत्येक विषयाची 80 गुणांची लेखी परीक्षा आणि 20 गुणांची तोंडी परीक्षा असे परीक्षेचे स्वरुप होते. त्यामुळे शाळेला “आपल्या’ विद्यार्थ्याला 20 गुणांपैकी अंतर्गत मूल्यमापनाद्वारे कितीही गुण देण्याची मुभा होती. परिणामी, निकालाचा टक्‍का वाढला आहे. तसेच, यंदा नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा होती. या सर्व कारणाने निकालात वाढ झाली, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.

चौकट : – विभागनिहाय निकालाची टक्‍केवारी
विभाग टक्‍के
पुणे 90.73
नागपूर 89.07
औरंगाबाद 90.98
मुंबई 88.30
कोल्हापूर 91.54
अमरावती 91.85
नाशिक 88.71
लातूर 90.60
कोकण 94.85
एकूण 90.03

चौकट : – विषयनिहाय निकाल
विषय टक्‍केवारी
इंग्रजी 93.40
मराठी 97.47
हिंदी 98.08
गणित 94.49
रसायनशास्त्र 97.34
जीवशास्त्र 97.66
भौतिकशास्त्र 95.58
इतिहास 96.53
भूगोल 95.35

चौकट :
राज्याचा शाखानिहाय निकाल
शाखा निकाल
विज्ञान 93.67
कला 86.33
वाणिज्य 89.97
एमसीव्हीसी 89.66

Leave a Comment