व्यर्थ आशावाद

Raj Thakare
एखाद्या नेत्याला आपला आवाका नीट समजत नसेल तर तो कल्पनेच्या किती उड्या मारू शकतो याचे उत्तम उदाहरण पहायचे असेल तर मनसेेचे नेते राज ठाकरे यांच्याकडे पहावे. त्यांना एखादी ग्रामपंचायत चालवायचाही अनुभव नाही. एवढेच नाही तर तशी एखादी ग्रामपंचायत ते नीट चालवलतील की नाही याची शंका यावी असे त्यांचे भाषण असते. पण ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याच्या वल्गना करीत असतात. किती वल्गना कराव्यात यावर कायद्याचे काही बंधन नाही म्हणूनच त्यांना आपल्या कल्पकतेच्या उड्या मारता येत आहेत. त्यांच्या या कल्पनेच्या भरार्‍यांना वस्तुस्थितीचा किंचितही आधार नाही. उलट वस्तुस्थिती त्यांच्या या वल्गनांशी पूर्णपणे विसंगत आहे.

मनसे हा पक्ष किती मोठा आहे आणि त्याची मर्यादा काय आहे याचा पडताळा आला आहे. त्याने लढवलेल्या दहाही लोकसभा मतदारसंघात अनामत रकमा जप्त झाल्या आहेत. मोदी लाटेचा फायदा घेत घेत त्यांनी मोदींसाठी मते मागितली तरीही अनामत रकमा राहिल्या नाहीत. एवढ्यावर राज ठाकरे यांनी आपण किती खोल पाण्यात आहोत याचा धडा घ्यायला हवा होता पण तरीही त्यांची मोठ्या वल्गना करण्याची सवय जात नाही. काल त्यांनी चिंतनासाठी जाहीर सभा घेतली आणि तिच्यात आपण स्वत: निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. लोकांनी कौल दिला तर आपण महाराष्ट्राचेही नेतृत्व करण्यास तयार आहोत असे त्यांनी जाहीर केले.

कोणी काय घोषणा करावी आणि कोणी किती मोठी डरकाळी फोडावी याला काही मर्यादा नाही. पण राज ठाकरे यांनी राज्याचे नेतृत्व करण्याची वल्गना करावी यासारखा मोठा विनोद नाही. काल त्यांनी आपल्या जाहीर सभेत चिंतन केले. त्यांची ही चिंतन करण्याची आगळी वेगळी पद्धत फारच गंमतीशीर आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली एकाही ‘खासदारा’ला डिपॉझिट वाचवता येत नाही त्या नेत्याने राजीनामा द्यायला हवा आणि नवा नेता निवडायला हवा पण मनसे हा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड आहे. खरे तर पराभवानंतरचे चिेंतन करताना कार्यकर्त्यांना त्यांची मते मांडायला लावली पाहिजेत. त्यांचे अनुभव आणि विश्‍लेषण ऐकून घेतले पाहिजे. पण राज ठाकरे कोणाचेच ऐकून घेत नाहंीत. मला कोणाचे काही ऐकून घेण्याची गरज नाही. मी केवळ सांगणार आणि सर्वांनी ऐकले पाहिजे असेच त्यांचे म्हणणे असते. तेव्हा चिंतन म्हणजे त्यांचेच भाषण. त्यांच्या त्या शिवराळ आणि उथळ भाषणावर फिदा असलेले त्यांचे कार्यकर्ते फार तर त्यांचे भाषण ऐकून घेतील पण जनता काही ते ऐकून घेणार नाही. किंबहुना जनतेने त्यांचे म्हणणे ऐकून घेतलेलेच नाही. कारण राज यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही याची जनतेला खात्री पटली आहे.

याही सभेत त्यांनी नाशिकमध्ये काय दिवे लावले याचा काहीच खुलासा केला नाही. एक फाईल तेवढी फडकवली. त्या फायलीत काय आहे, त्यात कामांचे तपशील असतील तर ते काय आहेत आणि काही असेल तर ते बघून महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना मुख्यमंत्री करावे असे त्यात काय आहे याचा काहीही खुलासा राज ठाकरे यांना करता आला नाही. मोदी लाटेची वाहवा केली एवढ्यावरून जनता राज ठाकरे यांना मतदान करणार आहेेत का ? मोदी लाट हा काही अपघात नाही. मोदी यांनी पंधरा वर्षेे जनतेला आपल्या प्रशासन कौशल्याची प्रचिती आणून दिली आहे. तशी प्रचिती राज ठाकरे यांनी आणून दिलेली नाही. राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते भले त्यांची तुलना मोदींशी करोत पण या दोघांची अजीबात तुलना होऊ शकत नाही. राज ठाकरे यांना साधी प्राथमिक शाळा चालवण्याचाही प्रशासकीय अनुभव नाही. राज ठाकरे यांनी थेट विधानसभेला हात घालायला नको आहे. त्यांनी आधी एखादी ग्रामपंचायत जिंकून चालवून दाखवली पाहिजे. एखादी शिक्षण संस्था चालवून दाखवली पाहिजे. राज ठाकरे यांना अगदी प्राथमिक स्तरावरील प्रशासनाचाही अनुभव नाही. तो त्यांच्या भाषणात कधी दिसत नाही. तसा तो असल्याचे ते आपल्या भाषणात सांगतही नाहीत. ते मोेदी यांचे नाव घेतात आणि त्यांचा आदर्श समोर ठेवल्याचा आव आणतात पण मोदी यांनी १९८६ साली एक शाळा काढली आणि ती उत्तर रीतीने चालवून दाखवली होती हे राज यांना ठावूक नाही.

राज यांना लोकसभा निवडणुकीत पराभव झाला हे मान्य आहे. पण ते पराभवातून उसळी मारून वर येऊ अशी वल्गना करीत आहेत. कोणालाच तशी उसळी मारता येत नाही असे काही आम्ही म्हणतनाही पण तशी उसळी मारण्यासाठी काही अंगभूत शक्ती असावी लागते. ती मनसेत नाही. आपला पराभव झालाय हे मान्य करताना ते म्हणतात, पराभव झाला म्हणून काय झाली? भाजपाचाही एकदा पराभव झाला होता. इंदिरा गांधी यांनाही पराभव स्वीकारावा लागला होता. पराभवातून भाजपा आता सत्तेवर आहे आणि इंदिरा गांधी याही नंतर विजयी झाल्या होत्या. तसे आपणही पराभवातून विजयाकडे वाटचाल करू असा त्यांचा विश्‍वास आहे. पण त्यांना हे कळत नाही की, एकदा पराभव झालेल्या प्रत्येकालाच नंतर यश मिळालेले नाही. ते म्हणतात तो प्रकार केवळ भाजपा आणि इंदिरा गांधी यांच्या बाबतीतच खरा आहे. इंदिरा गांधी एकदा पराभूत होेऊन नंतर विजयी झाल्या याचा अर्थ मनसेलाही असा विजय मिळेल हा निराधार आणि भाबडा आशावाद आहे.

Leave a Comment