ठाणे – पुण्यात विरोधी पक्षनेतेपद गमाविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कल्याण -डोंबवली महानगरपालिकेतही जबरदस्त हादरा बसला आहे. या पदासाठी कॉंग्रेसच्या दाव्याला शिवसेनेने ‘हिरवा कंदील’ दाखवून मनसेचे विरोधी पक्षनेतेपद काढून ते कॉंग्रेसला बहाल केल्याने मनसेवर लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणखी नामुष्की ओढवली आहे.
मनसेला हादरा ;सेनेमुळे विरोधी पक्षनेतेपदावरही ‘पाणी’
पुण्यात सदस्य संख्येत कॉंग्रेसला मागे टाकून मनसेने विरोधी पक्षनेतेपद मिळविले होते मात्र जातप्रमाणपत्रामुळे काही नगरसेवकांचे पद गेले तसे मनसेलाही विरोधीपक्षनेतेपदावर पाणी सोडावे लागले. महापालिका निवडणुकीत दणदणीत यश मिळविणाऱ्या मनसेमुळे सत्ताधारीच काय पारंपारिक विरोधीपक्षही अवाक झाले,विरोधक म्हणून मनसेचा पर्याय उभा राहिल्याने सेना-भाजप युतीला चिंतेचे ग्रहण लागले. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेकडील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे देण्याची खेळी शिवसेनेने यशस्वी केली. महापौर कल्याणी पाटील यांनी विशेषाधिकाराचा वापर करून काँग्रेसच्या विश्वनाथ राणे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आणि मनसेला धक्का दिला.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या पदासाठी विश्वनाथ राणे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्याला सेनेने साथ दिली. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादीनं एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. त्यात काँग्रेसचे १५ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १४ नगरसेवक निवडून आले होते. तर तीन अपक्षांनी आघाडीला पाठिंबा दिला होता. मनसेचे संख्याबळ २८ असून त्यापेक्षा अधिक आघाडीचे नगरसेवक आहेत. त्यावेळेस विरोधी पक्षनेता जाहीर करताना आघाडीवर अन्याय झाला होता. त्यामुळे हा अन्याय दूर करून विरोधी पक्षनेता म्हणून विश्वनाथ राणे यांच्या नावाची घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेता सचिन पोटे यांनी पत्रकाद्वारे महापौरांकडे केली होती.