भारत भेटीच्या निमंत्रणाचे चीनकडून स्वागत

jinping
येत्या वर्षात भारत भेटीवर येण्याचे चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांना पंतप्रधान मोदींकडून आमंत्रण दिले गेले असून या आमंत्रणाचे चीनकडून स्वागत करण्यात आले आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाकडून या भेटीमुळे दोन्ही देशातील संबंधाबाबत उच्चस्तरीय चर्चेला गती मिळेल अशी आशा व्यक्त केली गेली आहे.

चीनचे पंतप्रधान ली क्विग यांनी मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर मोदींनी हे आमंत्रण दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते किन गांग यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीही अनेक भारतीय नेत्यांनी शी चिंगफिग यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते.चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हे ८ जूनला भारत भेटीवर येत असून त्यावेळी ते मोदी यांचे समक्ष अभिनंदन करणार आहेत आणि भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत. या दौर्‍यात भारत चीन मध्ये प्रलंबित राहिलेल्या अनेक विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. त्यात गुंतवणूक, भारतीय रेल्वे आधुनिकीकरणात चीनचा सहयोग, व्यापारातील तूट, औषध निर्माण अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे.

चीनच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतलेल्या चिनफिंग यांनी वर्षाच्या कालावधीत ताकदवार नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे आणि त्यांनी भारताबरोबरचे संबंध सुधारण्याची इच्छाही वारंवार व्यक्त केली आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ली यांनी त्यांच्या पहिल्या परदेश दौर्‍यासाठी भारताची निवड केली होती असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment