बाटा, लिबर्टी शू कंपन्या विस्ताराच्या तयारीत

shoes
देशातील बड्या समजल्या जाणार्‍या बाटा, लिबर्टी आणि वुडलँड या पादत्राणे क्षेत्रातील कंपन्या आपला विस्तार देशाच्या कानाकोपर्‍यात करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते. त्यासाठी देशातील छोट्या शहरात फ्रेंचाईजी देऊन आपली दुकाने उघडण्याचा धडाका या कंपन्यांनी लावला असून त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची तयारीही केली आहे.

लिबर्टी शूजने देशभरात छोट्या शहरात या वर्षात १०० स्टोअर्स सुरू करण्याचा संकल्प केला असून ४ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा त्यासाठी विचार केला जात आहे असे व्यवस्थापकीय संचालक रमेश बंसल यांनी सांगितले. ते म्हणाले केरळात कंपनी १० आऊटलेट सुरू करत आहे आणि १० कोटी रूपये त्यासाठी गुंतविले जाणार आहेत. अन्य शहरात झांशी, जबलपूर, कानपूर, गोरखपूर, भावनगर, संभा, भोपाळ या शहरांचाही समावेश आहे.

देशातील प्रथम नंबरची कंपनी बाटाने पाच लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांवर लक्ष केंद्रीत केले असून ग्रामीण भागावर अधिक लक्ष पुरविले जात आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गोपालकृष्णन म्हणाले गेल्या कांही दिवसांत आम्ही देशात २० आऊटलेट सुरू केली असून राजस्थान, उत्तर प्रदेशातही सहा महिन्यापूर्वी आऊटलेट सुरू केली गेली आहेत.

Leave a Comment