राज्यात ‘ देवेंद्र ‘… मुंडेंच्या भूमिकेमुळे कुणाची कोंडी ?

munde_16
मुंबई – देशात नरेंद्र मोदी सरकार आल्याने भाजपमध्ये आत्मविश्वास वाढला आहे,तो इतका कि मित्रपक्षाच्या भूमिकेला आतापासूनच आव्हान देण्यापर्यंत मजल गेली आहे,राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्रीपदासाठी ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधून लोकसभेच्याधर्तीवर प्रयोगासाठी सर्वचजण आतुर झाले आहेत.त्यात गटातटाच्या राजकारणाला वरकरणी ‘तिलांजली’ दाखविण्यात येत असली तरी आतून कोणते डावपेच खेळले जात आहेत ?हाच मुद्दा भाजपमध्ये महत्वाचा ठरला आहे.

एकीकडे मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात निवडणुका अशी भूमिका मांडणाऱ्या विनोद तावडे यांच्या विधानाला बाजूला सारत खुद्द गोपीनाथ मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. ‘केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’, ही घोषणा चांगली असल्याची प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केल्याने भाजपच काय राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांना देण्यास मुंडेंचा पाठिंबा असल्याचेच संकेत मिळाल्याने आता शिवसेना भडकणार आहे.

ज्या पक्षाचे जास्त आमदार, त्यांचा मुख्यमंत्री, हे शिवसेना-भाजप युतीचं सूत्र आहे. तोच फॉर्म्युला येत्या विधानसभेतही वापरण्यात येईल, असा स्पष्ट खुलासा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी ‘राज्यात देवेंद्र’ या घोषणेनंतर केला होता. आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखालीच भाजप विधानसभा निवडणूक लढवेल,असे स्पष्ट केलेले असताना मुंडे यांनी देवेंद्र यांच्या नावाला पसंती दिल्याने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या शिवसेनेचे पित्त खवळणार आहे. पण मुंडेंच्या भूमिकेमुळे कोंडी कुणाची होणार ? हा प्रश्न युतीत महत्वाचा ठरणार आहे.

Leave a Comment