बेनामी देणग्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत

incometax
मुंबई – शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या खात्यात लोकसभा निवडणुकांपूर्वी जमा झालेल्या ३५ कोटी रूपयांच्या रकमेबाबत आयकर विभागाने बजावलेल्या नोटिसीला पक्षाकडून जो खुलासा केला गेला आहे त्यावर आयकर विभागाने असमाधान व्यक्त केल्यामुळे पक्षापुढच्या अडचणीत वाढ झाल्याचे समजते.

या संबंधीची हकीकत अशी की लोकसभा निवडणुकांपूर्वी मार्च एप्रिल महिन्यात राष्ट्रवादीच्या खात्यात मोठ्या रकमा जमा केल्या गेल्या होत्या आणि त्या बेनामी होत्या. ही रक्कम सुमारे ३५ कोटींच्या घरात होती व त्यासंदर्भात आयकर विभागाने पक्षाकडे खुलासा मागितला होता. त्यावर पक्षाने ही संपत्ती कूपने वाटून मिळालेल्या पैशांतून जमा झाल्याचा खुलासा केला होता. मात्र तो आयकर विभागाने मान्य केला नाही. ज्या व्यक्तींना कुपने दिली त्यांची यादी सादर करण्याचे आदेश आयकर विभागाने राष्ट्रवादीला दिले आहेत.

गेल्या वर्षात राष्ट्रवादीच्या खात्यावर ६१ कोटी ५ लाख रूपये जमा असून त्यातील ३५ कोटी रूपये रोख भरले गेले आहेत. त्यातही २० कोटी ७५ लाख रूपयांच्या रकमा देणार्‍यांची नांवे अथवा पॅन नंबर दिले गेलेले नाहीत. त्यामुळे आयकर विभागाने राष्ट्रवादीला नोटीस बजावली आहे.

Leave a Comment