राज्यात प्रथमच पोलीस अधीक्षक-उपअधीक्षकावर गुन्हा !

osamanabad
उस्मानाबाद – कनगऱयातील ग्रामस्थांना जनावरांप्रमाणे झोडणार्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री आर. आर . पाटील यांनी दिले असून राज्यात पहिल्यांदाच पोलीस अधीक्षक आणि उपाअधीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
या प्रकरणात उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील आणि उपाअधीक्षक डॉ. वैशाली कडुकर सकृतदर्शनी दोषी असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट म्हटले असून घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी कनगरावासियांकडे दिलगिरीही व्यक्त केली आहे.

आर. आर. पाटील यांनी कनगरामध्ये जाऊन तेथील ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी पोलीसांच्या अमानुष हल्ल्याचा पाढाच गावकऱयांनी गृहमंत्र्यांपुढे वाचला. कनगरा गावातील महिलांनी गेल्या शनिवारी बेंबळी पोलीस ठाण्यात चोरीच्या मार्गाने होत असलेल्या दारू विक्रीवर कारवाई करावी, असे निवेदन दिले होते. पोलिसांनी तुम्हीच दारू पकडून दाखवा, त्यानंतर कारवाई करू, असे सुनावून त्या महिलांना पिटाळून लावले. सोमवारी सायंकाळी गावातील महिलांनी पुढाकार घेत दारू पकडली आणि पोलिसांना येऊन कारवाई करण्याची विनंती केली. पोलीस पाटील वाजीद शेख यांनी दारू पकडल्याबाबत पोलिसांना माहिती दिली.

पोलीस गावात आले आणि महिला व ग्रामस्थांनाच दमबाजी केली. संतप्त महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेल्या. त्या वेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यापकी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून तिला बाजूला ढकलून दिल्याची माहिती सरपंच राजेंद्र इंगळे यांनी दिली. अवैध दारू विक्री करणाऱ्यांना पोलीस पाठिशी घालीत असल्याचे पाहून ग्रामस्थांचा राग अनावर झाला. त्यांनी पोलिसांना चांगलाच चोप दिला. याबाबतची माहिती मिळताच रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दस्तुरखुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक लवाजमा घेऊन कनगरा गावात धडकले. रात्री ११ ते पहाटे तीन वाजेपर्यंत गावकऱ्यांना बदडून काढले.

पोलिसांनी घरांचे दरवाजे तोडले, ट्रॅक्टरच्या हेडलाइट्स फोडल्या. गावातल्या प्रत्येक घरात घुसून दिसेल त्या पुरुषाला बेदम मारहाण केली. तसेच ग्रामस्थांना अटक करून ग्रामस्थांवर पोलिसांच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. ग्रामस्थांनी घटना कथन केल्यानंतर गावकऱयांसमोरच आर. आर. पाटील यांनी पोलीस अधीक्षकांची खरडपट्टी काढली आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

ग्रामस्थांनी पोलीसांना मारहाण करणे चुकीचेच आहे. मात्र, ग्रामस्थांना धडा शिकवण्यासाठी अशा पद्धतीने संपूर्ण फौजफाटा घेऊन जाऊन एखाद्या गावावर हल्ला करणे बेकायदा आहे. त्यामुळे केवळ निलंबनाची कारवाई करून आपण थांबणार नाही. तर कायदा हातात घेणाऱया पोलीसांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले.तसेच मी खूप वर्षे राज्याचा गृहमंत्री आहे. असा प्रकार याआधी कधीच घडला नव्हता. त्यामुळे आपण दिलगिरी मागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment