आता अस्तित्वासाठी ‘राज’गर्जना !

raj
मुंबई – लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवामुळे वर्चस्वापेक्षा आता अस्तित्वाच्या लढाईपर्यंत वेळ येवून ठेपलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आगामी रणनीती काय ?यावर उद्या[ ३१ मे रोजी] मुंबईत पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे बोलणार असले तरी’ कशी वाट लावतो… माझी औकात दाखवून देतो’ की ‘चिकन सूप ‘ अथवा मोदींना पाठींबा यामुळे पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले ? याची कबुली मवाळ झालेले राज ठाकरे देतील का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे . त्यात ते पुन्हा ‘ब्लूप्रिंट’चा मुद्दा घेतात की नरेंद्र मोदींच्या प्रचाराची नक्कल विधानसभेसाठी वापरतील ?यावरूनही तर्क-वितर्क सुरु झाले आहेत.

लोकसभेत मिळालेल्या पराभवाला पाठीशी घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेच्या तयारी लागले आहेत. त्यांच्या अनेक भाषणात त्यांनी आपल्या ब्ल्यू प्रिंटची चर्चा केली होती. आता या विधानसभेला ते आपली ती ब्लू प्रिंट घेऊन जनतेसमोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यासाठी स्वत:ला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्य़ाचीही शक्यता आहे.

मोंदींनी ज्या प्रकारे निवडणुकांमध्ये विकासाचा मुद्दा समोर करत यश मिळवले . त्याप्रकारे राज ठाकरे हे देखील विकासाचा मुद्दा घेऊन विधानसभा निवडणूक लढवतील,असेही बोलले जात आहे;पण पक्षाचा पराभव का झाला ?यापेक्षा मागील निवडणुकांची मतांची टक्केवारी पाहता त्यात यंदा निम्म्याने जबरदस्त घट झाली आहे. लोकसभा निवडणुकीचे विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान हे विधानसभा निवडणुकीला जमेचे ठरते मात्र यंदा गतवेळ पेक्षा त्यात घसरण झाली आहे. त्यामुळे मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे, शिवसेना सरस ठरली आहे. मोदींना पाठींबा देवूनही शपथविधीला आमंत्रण कसे काय नाही ? या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलतात ?याकडेही पक्षाचे काय राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. सद्यस्थितीत मनसेकडून ‘या मला आपल्याशी बोलायचे’ अशी विनवणी करणारे जाहिरात फलक सर्वत्र लागले आहेत ,शिवाय सोशल मिडीयावरही त्याद्वारे ‘साकडे’ घातले जात आहे. आता उद्या राज ठाकरे सोमय्या ग्राऊंडवर जाहीर सभेत काय बोलणार ?यावर पक्षाची आगामी वाट’चाल’ अवलंबून राहणार आहे.