‘सीएम’च्या स्पर्धेत उद्धव ठाकरे;पण भाजपच ‘लक्ष्य’

udhdhav
मुंबई – लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर सेना -भाजप युतीला आता विधानसभेचे वेध लागले आहेत,मात्र जागावाटपावरून आतापासुनच युतीत झगडा सुरु झाला असला तरी ‘देशात नरेंद्र ,राज्यात देवेंद्र’ हा प्रचार करून भाजपने सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला आव्हान दिले आहे. त्यात मनसेकडून मोदींच्या धर्तीवर राज ठाकरे ‘सीएम’पदाचे उमेदवार याची रणनीती सुरु झालेली असताना आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी तयारीत असल्याची भूमिका मांडत ‘एका दगडात दोन पक्षी ‘ हा डाव खेळला आहे.

मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या नालेसफाईचा आढावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुंबई शहरात काही भागात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावं’ अशा आशयाचे बॅनर्स लावले आहेत ,त्यावर प्रतिक्रिया देताना मी मुख्यमंत्री व्हावं अशी कार्यकर्त्यांचीच इच्छा आहे, असं सांगत आपण मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असल्याचे त्यांनी जाहीर केले;पण राज्यात इतरही काही जण मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगून आहेत, असा टोला उद्धव यांनी राज यांचे नाव न घेता हाणला असला तरी त्यात भाजपही आहे का ? हा मुद्दाही महत्वपूर्ण ठरला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ३३ जागा वाढवून मागितल्या आहेत,पण त्यास सेनेंचा विरोध आहे. मुख्यमंत्री सेनेंचाच असेल हे आधीच उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले असले तरी भाजपनेते ते मानण्यास तयार नाहीत. सेनेने युतीत सेनाच मोठा भाऊ असे बोल भाजपला सुनावलेले असले तरी लोकसभेच्या यशात नरेंद्र मोदींची लाट आणि भाजपची साथ त्यामुळेच मित्रपक्षांना फायदा झाल्याचे समीकरण भाजपकडून मांडले जात आहे. त्यात लोकसभेच्या आखाड्यात मोदींना पाठींबा देताना पंतप्रधान मोदीच होतील ,अशी भूमिका सर्वप्रथम मांडल्याचे सांगणारे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना जबरदस्त पराभव पत्करावा लागल्याने, पक्षातून त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी ‘प्रमोट’ करण्याच्या प्रयोगाची चाचपणी करण्यात येत आहे.

परिणामी विधानसभेला काहीही होऊ शकते, हे हेरूनच महायुती शाबूत ठेवताना,त्यात अन्य म्हणजेच मनसेचा शिरकाव होऊ नये यासाठी सेनेकडून वर्चस्वासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. आणि आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची इच्छा आहे,मी मुख्यमंत्री व्हावे त्यामुळे या स्पर्धेत आपण असल्याचे जाहीर केल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. मात्र मित्रपक्ष भाजपला शह देताना मनसेच्या मनसुब्यावर पाणी फिरविण्याची चाल सेनेने खेळली असली तरी त्यांचा रोख भाजपवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment