मोदी सरकार … अण्णा हजारेंचेही मत बदलले

modi2
मुंबई -लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पर्यायाने भाजपला भरभरून मते देणाऱ्या जनतेबरोबर आता जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांनीही ‘अबकी बार मोदी सरकार’ हे मान्य करून मोदींच्या कर्तुत्वाचे गुणगान केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या अण्णांनी आता मात्र मोदी सरकारची तोंडभरून स्तुती केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अण्णांनी नव्या सरकारने चांगली सुरुवात केल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदींची स्तुती करतांना अण्णांनी केजरीवालांना पुन्हा टार्गेट केले आहे.

केजरीवाल भरकटले आहेत. जनतेने त्यांना दिल्लीचा मुख्यमंत्री बनविल्यानंतर त्यांना पंतप्रधानपदाची स्वप्नं पडायला लागली. पण वाराणसीत केजरीवाल मोदींच्या समोर टिकू शकणार नाहीत हे मला माहीत होते, असेही अण्णा म्हणाले. दिल्लीत विकास करून हे मॉडेल घेऊन देशातील जनतेसमोर जा, असेही आपण केजरीवालांना सुचवल्याचे अण्णांनी म्हटले आहे. पण केजरीवालांनी आपले म्हणणे मानले नाही, आणि आता चूक झाल्याचे ते सांगत फिरत आहेत,असा टोमणाही लगावला आहे. मात्र आता नातलगांना पीए न बनविण्याचा मोदींचा आदेश, काळ्या पैशांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याच्या निर्णयाचे अण्णांनी भरभरून कौतुक केले आहे. मोदी सरकारकडे एक व्हिजन असल्याचे अण्णांना आता दिसत आहे.मात्र याचवेळी मोदींच्या सत्तेत येण्याला मोदींची कार्यक्षमतेपेक्षा काँग्रेसचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा अनोखा तर्कही अण्णांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment