मुंबई – दरवर्षी मुंबापुरी पावसाळ्यात किमान पाच सात वेळा तरी ठप्प होते. रोजच्या रोज कित्येक तासांचा प्रवास करून कामावर जाणार्या चाकरमानींची त्यामुळे चांगलीच कोंडी होते. हे लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने मुंबईकरांसाठी खास मान्सून अॅप तयार केले आहे. १ जूनपासून हे अॅप मुंबईकर डाऊनलोड करू शकणार आहेत. पावसाळ्याच्या संपूर्ण सीझनमध्ये मुंबईची रोजची हालहवाल हे अॅप युजरला पुरविणार आहे.
मुंबईकरांसाठी मान्सून अॅप
या अॅपच्या मदतीने युजर त्याच्या आसपास किती पाऊस पडतो आहे, मुंबईच्या एखाद्या विशिष्ठ भागात किती पाऊस आहे, कोणत्या रस्त्यांवर पाणी साठले आहे, कोणते मार्ग बंद आहेत, कोणते सुरू आहेत, कुठली वाहतूक वळवली गेली आहे, समुद्राच्या भरतीची वेळ, तापमान, हवेतील आर्द्रता आणि पावसाचा अंदाज अशी सर्व प्रकारची हवामान खात्याकडून पुरविली जाणारी माहिती जाणून घेऊ शकणार आहेत. मुंबईत ५४ ठिकाणी बसविल्या गेलेल्या पर्जन्यमापकाच्या सहाय्याने सर्व ठिकाणच्या पावसाची माहिती गोळा केली जाणार आहे. हे अॅप अँड्राईड, आयओएस आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या फोनवर डाऊनलोड करता येणार आहे.