उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा अडचणीत ?

pawar_15
मुंबई – जलसिंचनातील घोटाळ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही काळ पदाचा राजीनामा द्यावा लागला होता,त्यात धरणातील पाण्या वरून केलेले वादग्रस्त वक्तव्यही भोवले होते,आता मात्र राज्य सहकारी बँकेवरून अजित पवार अडचणीत येण्याची दाट चिन्हे असून उपमुख्यमंत्रीपदावरही ‘पाणी’ फिरू शकते,अशी स्थिती निर्माण झाली आहे.

राज्य सहकारी बँकेला दीड हजार कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे तपासणी अधिकाऱ्यांनी नमूद केल्याने प्रकरण गंभीर बनले आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत इतक्या मोठ्या रकमेचा तोटा उघडीस आला आहे. या प्रकरणात संचालक मंडळाला दोषी ठरविण्यात आले आहे. पण या संचालक मंडळात उपमुख्यमंत्री अजित पवारही होते .

संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन करून कर्जाचा पुरवठा केल्याचेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच ९ साखर कारखान्यांना ३३१ कोटींचा कर्जपुरवठा राज्य सहकारी बँकेने केलेला आहे. यात सिंदखेडा कारखाना, सूतगिरण्यांना ६० कोटींचे कर्ज तर केन एग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्याने ११९कोटींचा तोटा झाला आहे. तसेच २४ साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, यातील २२५ कोटींची थकबाकी आहे.२२ कारखान्यांकडील १९५ कोटी रूपयांचे कर्ज असुरक्षित आहे. लघुउद्योगांना दिलेल्या कर्जामुळे ३.२५ कोटींचे नुकसान झाले आहे. कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री करूनही ४७८ कोटींची थकबाकी बँकेकडे आहे.खासगी पद्धतीने मालमत्ता विक्री, यात ३७ कोटींचे नुकसान झाले आहे. तर ८ थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीत ६.१२ कोटींचा तोटा झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.त्यात संचालक मंडळाने घेतलेल्या काही निर्णयामुळेच राज्य सहकारी बँकेला इतका तोटा झाल्याचे या तपासणी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. २०११ साली राज्य सहकारी बँकेला मोठा तोटा झाला होता. त्यामुळे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. तसेच बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती.

या संचालक मंडळात महाराष्ट्राचे उपमुख्यंमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील आणि माणिकराव पाटील यांच्या सारखे मातब्बर राजकारण्यांचा समावेश होता. त्यामुळे आता या तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण लावून धरण्यात येणार अशी चिन्हे दिसत असल्याने उपमुख्यमंत्र्याना टार्गेट करण्याचे राजकारणही रंगणार आहे. कारखाने आणि सूतगिरण्यांना विनाकारण दिलेल्या कर्जामुळेच राज्याच्या सहकारी बँकेला तोटा झाला असल्याचे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी म्हटले आहे. तोट्यामुळे बँक बूडत आहे. याला केवळ संचालक मंडळ जबाबदार असल्याने अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही विनोद तावडे यांनी केली आहे.

Leave a Comment