विधानसभा निवडणूकात आप चुका सुधारणार

aap
मुंबई – देशभरात अल्पावधीत प्रचंड सदस्य संख्या मिळालेल्या आम आदमी पार्टीने लोकसभा निवडणकांत झालेल्या चुका महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकात सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आम उमेदवारांनी मुंबईत सोमवारी आत्मचिंतन बैठक घेतली.

लोकसभा निवडणकांत ४८ जागा आम आदमी पक्षाने लढविल्या मात्र एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. इतकेच नव्हे तर ४६ उमेदवारांना त्यांची अनामत रक्कमही गमवावी लागली. या अपयशाचे खापर उमेदवारांनी पक्षनेतृत्त्वावर फोडले आहे. भ्रष्टाचार हा एकच मुद्दा घेऊन निवडणूक लढविली गेली ही पक्षाची सर्वात मोठी चूक ठरल्याचे या बैठकीत ठासून सांगितले गेले. तसेच स्थानिक मुद्दे प्रचारात घेतले गेले नाहीत, मोठे नेते सभेसाठी आले नाहीत, उमेदवारांना खर्चासाठी अत्यंत अपुरा निधी दिला गेला आणि तोही वेळेवर मिळाला नाही, स्टार प्रचारक आले नाहीत अशा अनेक अडचणी उमेदवारांनी मांडल्या.

आक्टोबरमध्ये होत असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभांसाठी पक्षाने सर्व जागा न लढविता जेथे पक्षाची ताकद आहे तेथेच उमेदवार द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. केवळ भ्रष्टाचारावर लक्ष केंद्रीत न करता स्थानिक प्रश्न प्रामुख्याने हाताळावेत. तसेच सोशल नेटवर्कवर पूर्ण अवलंबून राहू नये व त्याला नको इतके महत्त्व देऊ नये अशीही मागणी कार्यकर्ते करत आहेत. पक्षाची सभासद संख्या खूप वाढली मात्र प्रत्यक्ष मतदानात त्याचा परिणाम जाणवलेला नाही याचीही दखल घेतली जावी असेही आप नेत्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment