अमेरिकेतील वैज्ञानिकांनी सध्याच्या काळात अत्याधुनिक म्हणता येईल असा वायरलेस पेसमेकर तयार केला असून त्याच्या सशावर घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. तांदळाच्या दाण्याचा हा पेसमेकर मानवी शरीरातही यशस्वीपणे बसविता आला तर हृदयरोगावरील उपचारात मोठीच क्रांती घडेल असा विश्वास वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.
तांदळाच्या दाण्याएवढा वायरलेस पेसमेकर
केवळ तीन मिलीमिटर आकाराचा हा पेसमेकर स्टॅनफर्ड विद्यापीठातील वैज्ञानिकांच्या टीमने तयार केला आहे. हा पेसमेकर म्हणजे एक मेटल प्लेट आहे. यामुळे हृदयाची गती नियंत्रित करता येते. आकाराने अगदीच लहान असल्याने त्याचे मानवी शरीरात प्रत्यारोपण करणे अतिशय सुलभ होणार आहे. सध्या सशाच्या हृदयावर हा पेसमेकर बसवून चाचण्या केल्या जात आहेत.
सध्या बसविले जात असलेले पेसमेकर हे काडेपेटीच्या आकाराचे आहेत. शिवाय त्यांच्या बॅटर्या रिचार्ज कराव्या लागतात. नवीन वायरलेस पेसमेकरमुळे हा त्रास संपणार आहे नवा पेसमेकर एका मोबाईल फोनला जितकी उर्जा लागते तेवढ्याच उर्जेवर काम करतो असेही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. हे संशोधन अमेरिकन जर्नल प्रासिडिंग ऑफ नॅशलन अॅकॅडमी ऑफ सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.