कुणाला ‘नारळ’ ,कुणाला संधी ;आघाडीच्या ‘कारभारा’त फेरबदल !

ncp_1
मुंबई – जनता कधीही कुणाला सत्ता देते याचा अनुभव घेणाऱ्या कॉंग्रेस -राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुका ‘तारेवरच्या कसरती ‘ ठरणार आहेत . मंत्रिमंडळ असो पक्षाच्या पातळीवर खांदेपालट करणे अनिवार्यच असते. आता नेमकी तीच वेळ राज्याच्या कारभाऱ्यांवर ओढवली आहे. लोकसभेतील दारूण पराभवानंतर आघाडीच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. मात्र फेरबदल की विस्तार याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी ‘भाकरी’ फिरवणार असली तरी कॉंग्रेसच्या गोटात अजून तरी आलबेल आहे .

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज्यातील आघाडीच्या मंत्रिमंडळात उद्या फेरबदल होणार आहेत . फेरबदलात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड व आमदार शरद गावित यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांना ‘निरोप’देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.अचानक भास्कर जाधव, सुर्य़कांता पाटील यांच्या नावांचाही मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो असेही सूत्रांचे म्हणणे आहे. औरंगाबादमध्ये आघाडीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत फौजिया खान यांनी सहकार्य न केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांना हटविण्याची मागणी होत असून त्यांच्या जागी शरद गावित यांची वर्णी लागणार आहे.

गावित हे समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार असून विजयकुमार गावित यांचे सख्खे भाऊ आहेत.राजभवनात उद्या सकाळी दहा वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान काँग्रेसकडून अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही. लोकसभेच्या अवघ्या दोन जागा जिंकू शकलेल्या काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणूक डोळ्यांपुढे एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.

Leave a Comment