शिवसेनेचा हिशोब

shivsena_13
१९९८ साली भारतीय जनता पार्टीचे १८५ खासदार निवडून आले होते. शिवसेनेचे खासदार १२ होते. वाजपेयी सरकारचे बहुमत सिध्द झालेले असले तरी त्यांना तेलुुगु देसमचा बाहेरून पाठिंबा होता. म्हणजे वाजपेयींना २३५ खासदारातून ६० मंत्री निवडायचे होते. परिणामी दर चार खासदारामागे एक खासदार मंत्री होऊ शकत होता. म्हणून शिवसेनेच्या वाट्याला तीन मंत्रीपदे आली. आता शिवसेनेचे१८ खासदार आहेत आणि त्यामुळे आपल्याला चार मंत्रिपदे मिळावीत अशी त्यांची मागणी आहे. पण ते शक्य दिसत नाही. कारण मोदींना ६० मंत्र्यांचे मंत्रिमंडळ नको आहे. त्यांना जेमतेम ४५ मंत्री करायचे आहेत आणि त्यासाठी त्यांना ३४५ जणांतून निवड करायची आहे. म्हणजे दर ७ जणांमागे एक मंत्री होऊ शकतो. त्या हिशोबाने शिवसेनेला दोनच मंत्रिपदे मिळू शकतात. पण मोदीची मनःस्थितीसुध्दा वेगळी आहे. कारण त्यांच्या भारतीय जनता पार्टीला एकट्यालाच २९० जागा मिळाल्या आहेत. म्हणजे एकूण खासदारांची संख्या, मंत्र्यांची संख्या तसेच पंतप्रधानांची मनःस्थिती या घटकांमुळे शिवसेनेची मंत्रिपदाची अपेक्षा पूर्ण होईल असे दिसत नाही. मात्र या गोष्टी उध्दव ठाकरे विचारातच घेत नाहीत.

१९९८ सालप्रमाणेच ते भाजपावर दबाव आणत आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले हे खरे आहे परंतु त्याच बरोबर भाजपाचेसुध्दा २४ खासदार निवडून आले आहेत. हे शिवसेनेला कसे नाकारून चालेल? वाजपेयी सरकारला बाळासाहेब ठाकरे वारंवार दबाव आणून नमवत असत. तसे आपण मोदींना नमवले पाहिजे असा विचार जर उध्दव ठाकरे करत असतील तर ती त्यांची मोठीच राजकीय चूक ठरणार आहे. मंत्रिमंडळावरून उध्दव ठाकरे यांनी मोदींना दटावायचा प्रयत्न केला. मनपसंत खाते मिळाले नाही म्हणून आपले मंत्री अनंत गीते कामाची सूत्रे हाती घेणार नाहीत असा हटवादीपणाही केला. परंतु नरेंद्र मोदी बधले नाहीत. शेवटी गीते यांना कामाची सूत्रे हाती घ्यावी लागली. उध्दव ठाकरेच नमले. नरेन्द्र मोदी एरवी या दबावापुढे नमले असते पण हे नमो आता नमायच्या मन:स्थितीत नाहीत कारण त्यांचे सरकार काही शिवसेनेच्या टेकूवर अवलंबून नाही. अशा स्थितीत शिवसेनेने शहाणपणाने नमती भूमिका घेतली पाहिजे पण उद्धव ठाकरे बाळासाहेबांप्रमाणे वागायचा प्रयत्न करत आहेत. शिवसेना हा इतर अन्य पक्षांप्रमाणेच भाजपाचा मित्रपक्ष आहे. भाजपाला शिवसेनेपेक्षा रामविलास पासवान यांच्या लो.ज. पक्षाचा मोठा आधार आहे. या पक्षाचे शिवसेनेएवढे खासदार निवडून आलेही नसतील पण त्यांच्या पाठिंब्याने बिहारमध्ये भाजपाला दलित मतांचा आधार मिळू शकतो.

पासवान यांच्या पक्षाची एवढी महती असतानाही ते आपल्याला मिळालेल्या तुलनेने कमी महत्त्वाच्या खात्यावर समाधान मानून बसले आहेत. त्यांना आता आपण या बाबतीत दबाव टाकावा अशी स्थिती नाही हे कळते. शिवसेनेकडे तेवढा सूज्ञपणा नाही. तेलुगु देसम आणि भाजपा यांच्या युतीतही भाजपा गरजू पक्ष आहे आणि तेलुगु देसमच्या वर्चस्वाचा फायदा भाजपाला होत आहे पण अशा स्थितीतही तेलुगु देस पक्षाने केवळ एका मंत्रिपदावर समाधान मानले आहे. उध्दव ठाकरे यांना मात्र या बाबतीत किती ताणून धरावे हे कळत नाही. नवाज शरीफ यांना शपथविधीला पाचारण करावे की नाही हे ठरवण्यासाठी मोदींनी शिवसेनेला विचारले नाही. त्यांना पाचारण करण्यात येत आहे हे कळल्यावर शिवसेनेने नाराजीचे नाटक करायला सुरूवात केली. मोदींनी नवाज शरीफ यांना पाचारण केले ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काही पडसाद उमटवणारी घटना आहे. उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली म्हणून घाबरून जाऊन मोदी शरीफ यांचे निमंत्रण काय रद्द करणार नव्हते. बाळासाहेब हयात असताना अशा प्रश्‍नात भाजपाचे कोणी तरी नेते मुंबईत येऊन त्यांना भेटत असत आणि त्यांची समजूत काढत असत. मग बाळासाहेब सम्मती देत असत. वडीलधारे म्हणून त्यांचाही मान राखल्यासारखे होत असे पण आता अशी काही स्थिती नाही.

आपण नवाज शरीफ यांना विरोध केला तरीही मोदी यांनी त्या विरोधाची साधी दखलही घेतली नाही. शेवटी आपण त्याच शरीफ यांच्या उपस्थितीतल्या कार्यक्रमाला सहकुटुंब हजर झालो. या घटनेतून मोदी आपल्याला कुठपर्यंत हिंग लावणार याचा अंदाज उध्दव ठाकरे यांना यायला हवा होता पण ते कळाले असूनही त्यांनी मंत्रिमंडळावरून आणि खात्यावरून नाटक केलेच. अनंत गीते यांना टाकावू खाते दिले आहे असे आकांडतांडव केले आणि पुन्हा एकदा मोदींनी शिवसेनेला तिची जागा दाखवून दिली. मोदींनी सर्वांनाच हे बजावून सांगितले आहे की, आपण देऊ तेच खाते घ्यावे लागेल. ज्यांना ते पसंत नसेल त्याने ते सोडून द्यावे. गीते यांच्या बाबतीत त्यांनी याच इशार्‍याची पुनरुक्ती केली असणार. म्हणून आधी आदळ आपट करणार्‍या शिवसेनेने मोदींनी दिलेले खाते मुकाटपणे स्वीकारले. अनंत गीते यांनी आपल्या खात्याचा कार्यभारसुध्दा हाती घेतला आहे. मंत्रिमंडळात शिवसेनेचे किती मंत्री असावेत याचा हिशोब उध्दव ठाकरे वाजपेयींच्या काळाप्रमाणे करत आहेत. पण त्या काळात आणि आजच्या काळात झालेले बदल तसेच बदललेली मनःस्थिती याचा विचारच करायला ते तयार नाहीत. ते जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत ते वारंवार दबावाचे व्यर्थ राजकारण करत राहणार आहेत.

Leave a Comment