मुंबई- अवजड उद्योग हे बिनमहत्त्वाचे खाते मिळाल्यामुळे नाराज झालेले शिवसेनेचे आमदार अनंत गिते यांनी त्यांच्या मंत्रालयाचा भार अद्यापीही स्वीकारला असून हा भार स्वीकारायचा का नाही याचा निर्णय आज सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे घेणार असल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रातील सहा जणांना मोदी मंत्रीमंडळात स्थान मिळाले असून त्यातील तीन जणांनी आपल्या मंत्रीपदाचा भार सांभाळलाही आहे. मात्र सेनेला हवे असलेले ग्रामीण विकास खाते गोपीनाथ मुंडे यांना दिले गेले आहे आणि अगदीच कमी महत्त्वाचे खाते सेनेच्या वाट्याला आले आहे.यामुळे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे नाराज झाले असून त्यांनी ही नाराजी भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्या कानी घातली असल्याचेही सांगितले जात आहे.
गिते कार्यभार सांभाळणार का याचा आज निर्णय
सेनेला मोदी मंत्रीमंडळात किमान ३ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे अपेक्षित होती. त्यातही पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मोदींनी शपथविधीसाठी निमंत्रण केल्याने सेना रागावली होती. मात्र त्याबाबत कोणतीच तिखट प्रतिक्रिया देण्याचेही सेनेने टाळले होते. त्यातच आता कमी महत्त्वाचे आणि तेही एकच मंत्रीपद सेनेला दिले गेले आहे. भाजप स्वबळावर बहुमतात असल्याने सर्वच घटक पक्षांची तोंडे सध्या तरी बंद असली तरी सेनेने या बाबतीत मात्र माघार न घेण्याचे ठरविले आहे असेही समजते. यामुळे गिते यांनी अद्यापी मंत्रालयाचा भार स्वीकारलेला नाही. त्याचा निर्णय आज उद्धव ठाकरे घेणार असून तेही गेले काही दिवस दिल्लीतच मुक्काम ठोकून आहेत.