मीठ उत्पादनात भारत जगात तिसरा

salt
मीठ- मनुष्याच्या अनेक गरजांतील एक महत्त्वाची गरज. आहाराचा मुख्य हिस्सा असलेले हे मीठ भारतात स्वातंत्र्यापूर्वीपर्यंत आयात केले जात होते याची कल्पनाही बर्‍याचजणांना नसेल. मात्र जेवण आणि जीवनाला रूची आणणार्‍या मीठावर आता भारतीयांनी चांगलेच प्रभुत्व मिळविलेले आहे. आज मीठ उत्पादन करणार्‍या देशात भारताचा नंबर जगात तिसरा आहे. गेल्या सहा दशकात या उद्योगाचा वेगाने विकास झाला असून देशातील १२० मीठ उत्पादक वर्षाला २.४ कोटी टन मीठ तयार करत आहेत.

भारतात मीठाची देशांतर्गत गरज १.८ कोटी टनांची आहे. स्वातंत्र्यापूर्वी आयात करावे लागणारे मीठ भारत आता अनेक देशांना निर्यातही करत असून ही निर्यात वर्षाला ५० लाख टनांची आहे. अल्पमोली आणि बहुगुणी मीठ भारतीय अर्थव्यवस्थेतही मोठा वाटा हस्तगत करू पाहात असून २०२० पर्यंत मीठाची निर्यात १ कोटी टनांवर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भारतात बनविण्यात येणार्‍या एकूण मीठात ७० टक्के मीठ समुद्री पाण्यापासून बनविले जाते,२८ ट्क्के भूमिगत खार्‍या पाण्यापासून तर उरलेले २ टक्के सरोवरे आणि खडकांपासून बनते.गुजराथ मीठ उत्पादनात अग्रेसर असून त्यांचा वाटा ७० टक्के आहे. त्यापाठोपाठ तमीळनाडू ११ टक्के, राजस्थान १० टक्के असा हा हिस्सा आहे. शिवाय आंध्र, महाराष्ट्र, ओडिसा, कर्नाटक, प.बंगाल, गोवा, हिमाचल, दीव दमण या राज्यातूही मीठ उत्पादन घेतले जाते. मीठ उत्पादन खासगी क्षेत्राकडून अधिक प्रमाणात केले जाते. जपान, बांग्लादेश, इंडोनेशिया, दक्षिण व उत्तर कोरिया, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती, व्हिएतनाम, कतार या देशांना भारत मीठ निर्यात करतो.

मीठाचा उपयोग केवळ अन्नपदार्थात होतो असे नाही तर त्यात अनेक औषधी गुणधर्मही आहेत. त्यामुळे औषधे, अन्नपदार्थ टिकविण्यासाठी, औद्योगिक क्षेत्रे अशा अनेक क्षेत्रात मीठाचा वापर केला जातो. भारतीय मीठ उद्योगाने २०२० सालापर्यंत मीठ उत्पादन ४ कोटी टनांवर नेण्याचा संकल्प केला असून देशातील तोपर्यंत निर्माण झालेली २.५ कोटी टनांची गरज पूर्ण करून १ कोटी टन निर्यातीचे लक्ष्य ठेवले गेले आहे. मीठ उत्पादनासाठी ६.१ लाख एकर जमीन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर केला जात आहे.

Leave a Comment