कॉंग्रेसची टीका ;सेनेच्या मताला काय किंमत !

udhdhavthakeray
मुंबई – भाजपने कधीही शिवसेनेच्या पाकिस्तानबाबतच्या धोरणाला फारशी किंमत दिलेली नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना शिवसेनेने पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीला विरोध केला होता. त्यावेळी राज्यसभेत बोलताना वाजपेयींनी शिवसेना अतिरेक्यांपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे म्हटले होते. वाजपेयींच्या काळात शिवसेनेला दहशतवाद्यांपेक्षा अधिक अविश्वासार्ह मानणारी भाजप आता मोदींच्या काळात शिवसेनेला काय किंमत देत असेल, याबाबत न बोललेलेच बरे.अशा शब्दात कॉंग्रेसने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या ‘घुमजाव’ भूमिकेवर सडकून टीका केली आहे.

पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भारत दौऱ्याला विरोध करणाऱ्या शिवसेनेने अचानक भूमिका बदलून शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना वेळ पडल्यास ते अणुबॉम्ब फोडतील, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. सेनेच्या या घुमजाव भूमिकेची काँग्रेसने खिल्ली उडवली आहे.प्रसिद्धीपत्रकात कॉंग्रेसने म्हटले आहे की ,चारच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानशी क्रिकेट संबंध तोडण्याची भाषा वापरली होती. तरीही मोदींनी नवाज शरीफ यांना शपथविधीचे निमंत्रण पाठवून शिवसेनेच्या मताला कचऱ्याची टोपली दाखवली. त्यामुळेच शिवसेनेने आपला विरोध गुंडाळून झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवण्याचा अपयशी प्रयत्न केला.असेही कॉंग्रेसने म्हटले असून ठाकरेंच्या अणुबॉम्ब वक्तव्याचाही खरपूस समाचार घेताना म्हटले आहे कि, शिवसेनेच्या मुखपत्रातून नरेंद्र मोदी अणुबॉम्ब वगैरे फोडतील, अशा वल्गना करून शिवसेनेने चव्हाट्यावर आलेली अब्रू वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी मोदींनी अणुबॉम्ब फोडण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा मातोश्रीवर सुतळी बॉम्ब फोडावेत व त्यातच धन्यता मानावी. हवे असल्यास त्या बॉम्बच्या भीतीने आम्ही मुद्दाम कानावर हात ठेवून शिवसेनेला काही तरी मोठे काम केल्याचा आनंद मिळवून देऊ.असा उपरोधिक टोमणाही कॉंग्रेसने हाणला आहे.

Leave a Comment