नवे पर्व सुरू

modi2

भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले आहे आणि या सरकारचा नवा कारभार सुरू होत आहे. कामाच्या पहिल्याच दिवशी आपण केंद्र सरकारच्या सगळ्या खात्यांची सविस्तर माहिती करून घेऊ असे नव्या पंतप्रधानांनी जाहीर केले. त्यांना ती माहिती देता यावी म्हणून सर्व विभागांचे सचिव आपल्या खात्याच्या ध्वनिचित्रफिती (सीडी) तयार करत आहेत. पंतप्रधान स्वतःसुध्दा आपल्या स्वप्नातल्या भारताची सीडी तयार करत आहेत आणि ती सुध्दा दाखवली जाणार आहे. भारताच्या इतिहासात असे कधी घडले नव्हते. म्हणजे दिल्लीच्या तख्तावर मोदी सरकार येणे म्हणजे एक नवे तंत्रज्ञानाचे युग सुरू होणे आहे. या युगाने सगळ्या जुन्या कल्पना मोडीत काढल्या आहेत. नरेंद्र मोदी यांची पद्धत, भाषा आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शैली या सगळ्याच गोष्टी या देशातल्या नव्या वातावरणाशी सुसंगत आहेत. त्यांचे विरोधक मात्र पुरोगामी, प्रतिगामी, जातीयवादी, सेक्युलर असे वर्षानुवर्षे वापरून गुळगुळीत झालेले शब्द वापरत राहिले. ते राजकारणाची नवी भाषा समजू शकले नाहीत, त्यांना आता आपल्या पराभवाची कारणे शोधताना सुद्धा भरपूर चाचपडावे लागत आहे.

नरेंद्र मोदी यांनी आपला शपथविधीचा सोहळा सुद्धा आगळावेगळा करून दाखवला आणि सर्वांना चकित केले. आपला शपथविधी भव्यदिव्य तर व्हावाच, पण जगाच्या राजकारणामध्ये भारत ही किती मोठी शक्ती आहे याचा प्रत्यय देणारा असावा असाही कटाक्ष त्यांनी ठेवला. भारत हा सार्क संघटनेतला मोठा देश आहे. या संघटनेतले आपले श्रेष्ठत्व शपथविधीच्या निमित्ताने स्पष्ट व्हावे म्हणून नरेंद्र मोदींनी नाट्यमयरित्या या सर्व देशांच्या प्रमुखांना शपथविधीस पाचारण केले. नरेंद्र मोदी यांची ही नवी चाल सर्वांसाठी नाट्यमय होती. पाकिस्तानात तर नरेंद्र मोदींचे निमंत्रण जाऊन पोचले तेव्हा पाकिस्तानचे सरकार सुद्धा संभ्रमात पडले. या निमंत्रणाला होकार द्यावा की नकार यावर तिथे तीन दिवस खलबते होत राहिली. शेवटी तिसर्‍या दिवशी नवाज शरीफ यांचा होकार आला. भारताकडून असे निमंत्रण येईल अशी त्यांची अपेक्षाही नव्हती, त्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला. भारतातल्या अनेक मोदीविरोधकांप्रमाणेच पाकिस्तानचे सत्ताधारी नेते सुद्धा नरेंद्र मोदींना मुुस्लिमविरोधी समजत होते. ते मुस्लिमविरोधक असल्यामुळे पाकिस्तानच्या सत्ताधारी नेत्याला ते शपथविधीचे निमंत्रण पाठविणार नाहीत अशी त्यांची कल्पना होती. त्यामुळे आधी तर पाकिस्तानचे नेते आश्‍चर्यचकित झाले.

भारतात सुद्धा हिंदुत्ववाद न समजलेले अनेक अडाणी पण पुरोगामी पत्रकार आहेत. भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवार हे मुस्लिमांच्या विरोधात आहेत असा त्यांचा समज आहे. संघ परिवाराने वारंवार खुलासा केलेला आहे की, संघ परिवार मुस्लिमांच्या विरोधात नसून मुस्लिमांचा अनुनय करून हिंदूंचा अपमान करण्याच्या कॉंग्रेसच्या धोरणाच्या विरोधात आहे. परंतु काही संघविरोधक अज्ञानाने आणि काही आपल्या स्वार्थासाठी संघाची मुस्लिमविरोधक म्हणून बदनामी करत असतात. अज्ञानाने किंवा अजाणतेपणाने संघाला मुस्लिमविरोधी समजणार्‍या अशा लोकांचा भारतातल्या लाखो लोकांवर परिणाम झालेला आहे आणि ते सुद्धा संघाला, भाजपाला आणि मोदीला मुस्लिमविरोधी समजत आलेले आहेत. अशा सार्‍या लोकांना मोदींनी नवाज शरीफ यांना निमंत्रण देणे हे धक्कादायक वाटते. काही वृत्तवाहिन्यांनी या निमंत्रणाचे वृत्त देताना, शरीफ यांना निमंत्रण देऊन मोदींनी राजकीय पंडितांना चकित केले आहे, अशी टिप्पणी केलेली होती. ही टिप्पणी सुद्धा अज्ञानातून निर्माण झालेली आहे. ज्यांना संघ म्हणजे काय माहीत आहे ते मोदींच्या या निमंत्रणाने कधीही चकित होणार नाहीत आणि झालेले नाहीत.

१९७७ साली अटलबिहारी वाजपेयी हे परराष्ट्र मंत्री होते. त्यांच्यापूर्वी १९७२ साली इंदिरा गांधींनी पाकिस्तानशी चर्चा करून सिमला करार केलेला होता. तो करार झाला आणि बासनात गुंडाळून ठेवला गेला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांची चर्चा बंदच झाली. १९७७ साली वाजपेयी यांनी स्वत: पुढाकार घेऊन ही चर्चा पुन्हा सुरू केली तेव्हा सुद्धा या कथित राजकीय पंडितांनी चकित होऊन काही टिप्पणी केली होती. वाजपेयीसारख्या हिंदुत्ववादी नेत्याने पाकिस्तानच्या चर्चेबाबत पुढाकार घ्यावा हे त्यांच्या गैरसमजाच्या पलिकडचे होते. पण वाजपेयींनी चर्चा सुरू केली ही वस्तुस्थितीही नाकारता येत नव्हती. आता मोदींनी पुन्हा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकले आहे. मात्र ते टाकण्यापूर्वी हे सगळे चकित होणारे राजकीय पंडित, वाजपेयी वेगळे होते, मोदी त्यांच्यासारखे नाहीत असे शेरे मारलेले आहेत. खरे म्हणजे वाजपेयी आणि मोदी यांच्यात फरक नाही. कोणताही हिंदुत्ववादी नेता मग तो वाजपेयी असो की मोदी असो, याच मार्गाने जाणार आहे. हिंदुत्ववाद ही मुस्लिमांचा द्वेष करणारी विचारसरणी आहे असा सातत्याने प्रचार करण्याची खोड जडलेल्या नेत्यांना अशा गोष्टी घडल्या की आश्‍चर्य वाटणार आहे. मात्र आता त्यांना मोदींचे धोरण बघून आपल्या धारणा बदलाव्या लागणार आहेत. त्या बदलताना तरी ते प्रांजळपणे बदलतील अशी अपेक्षा करूयात.

Leave a Comment