केजरीवाल करताहेत दिशाभूल

kejriwal2_11
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाच्या प्रकरणात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याबाबत संबंधित न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांना कायदा म्हणजे काय हे समजून घेण्याचा सल्ला दिला आहे. केजरीवाल यांना गडकरींच्या प्रकरणात माफी तरी मागावी लागेल किंवा सरळ जेलमध्ये जावे लागेल. ही गोष्ट त्यांच्या लक्षातसुध्दा आलेली आहे. परंतु त्यामुळे घाबरलेल्या केजरीवालांनी हे संकट टाळण्यासाठी कायदा, आरोपी, फिर्यादी या सगळ्यांच्या व्याख्या बदलून टाकत लोकांची दिशाभूल करायला सुरूवात केली आहे. ते न्यायालयाशी झगडा करून विनाकारण १५ दिवस तुरुंगात पडले आहेत. त्यांच्या या तुरुंगवासाला त्यांचा अट्टाहास आणि लोकांची दिशाभूल करणारा पवित्रा कारणीभूत आहे. मात्र त्यांनी विनाकारणच निरपराधी असल्याचा आणि आपल्याला अन्यायाने तुरुंगात ठेवले असल्याचा बहाणा करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा व्यर्थ प्रयत्न चालवला आहे. त्यांनी नितीन गडकरी यांना चोर म्हटले आहे आणि त्यांच्या मते गडकरी चोर आहेत आणि केजरीवाल हे चोरी उघड करणारे मोठे देशभक्त आहेत अशी प्रतिमा निर्माण करून ते तुरुंगातून जनतेला पत्रे लिहायला लागले आहेत.

वास्तविक परिस्थिती उलट आहे. नितीन गडकरी चोर आहेत की नाही हे न्यायालयात सिध्द झालेले नाही. त्यांना चोर म्हणणारे कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी चक्क त्यांची माफी मागून सुटका करून घेतली आहे आणि त्याच्याच दुसर्‍या दिवशी आयकर खात्याने गडकरींना क्लीन चिट दिली आहे. अशा अवस्थेत त्यांच्यावर खोटा आरोप करणे हा केजरीवाल यांचा गुन्हा आहे पण ते स्वतःची भ्रामक प्रामाणिक प्रतिमा उभा करण्याचा आटापिटा करत आहेत. अरविंद केजरीवाल यांना बालिश आणि पोरकट म्हटले जाते ते यामुळेच. त्यांचा नुकताच मोठा पराभव झाला. तो का झाला याचा गंभीरपणे विचार केला जावा अशी अपेक्षा या पक्षातल्याच अनेक ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली असून तशी जाहीर विधानेही केली आहेत. पण पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि योगेन्द्र यादव यांनी आत्मपरीक्षण करण्या ऐवजी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची राजनीती सुरू केली आहे. यादव हे यापूर्वी काही जनमत चाचण्यांचे विश्‍लेषण करताना दिसत होते. वृत्त वाहिन्यांवर बोलताना ते इतर अनेक पक्षांना शहाणपण शिकवत होते पण त्यांनाच एक पक्ष चालवताना ते शहाणपण का सुचत नाही. अरविेंद केजरीवाल यांना अटक झाली तेव्हा निदर्शने करणार्‍या कार्यकर्त्यांत यादव होते.

न्यायालयाच्या निकालाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करून काही उपयोग होत नसतो ही साधी गोष्ट त्यांना कळत नाही. सत्र न्यायालयाचा किंवा महानगर दंडाधिकार्‍यांचा निर्णय आवडला नसल्यास त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली जाते. आजवर असेच होत आले आहे. महानगर दंडाधिकार्‍याचा निर्णय न आवडल्यास निदर्शने करण्याचा प्रकार या देशात तरी पहिलाच आहे. बरे ही निदर्शनेही कोठे केली आहेत तर तुरुंगाच्या समोर. या निर्णयाशी तिहार तुरुंगाचा काहीही संबंध नाही. आता हे लोक दिल्लीत घरोघर जाऊन केजरीवाल यांच्यावर किती मोठा अन्याय झालाय हे समजून सांगणार आहेत. असे काय मोठ झालेे आहे की घरोघर जाऊन प्रचार करावा लागत आहे ? या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन सत्यच सांगायचे ठरवले तर त्यांना जात मुचलका आणि जामीन यातला फरक सांगावा लागेल. एक तर तो लोकांना समजणार नाही आणि समजला तरीही त्यात असा काय मोठा अन्याय झाला, असाच प्रश्‍न कोणीही कायद्याची सामान्य माहिती असणारा माणूस विचारील. तेव्हा या कार्यकर्त्यांना खरी माहिती सांगणे कठीण होत जाईल. म्हणून हे लोक आता नितीन गडकरी यांच्या प्रकरणात अन्याय होत असल्याचे खोटेच सांगत आहेत. यावरही लोकांचा विश्‍वास बसणार नाही.

अरविंद केजरीवाल जामीन द्यायला तयार नाहीत पण योगेन्द्र यादव यांनी मात्र आपली सुटका जामीन देऊन करून घेतली आहे. आता यादव जर हा जामीन देणे चुकीचे मानत नसतील तर केजरीवाल यांना तो चुकीचा का वाटत आहे ? असाही प्रश्‍न कोणाच्याही मनात आल्याविना राहणार नाही. एकंदरीत आपचे नेते लोकांना चुकीची आणि खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत कारण नितीन गडकरी यांचे प्रकरण उभे राहील तेव्हा त्यांना फार अवघड प्रसंगाला तोंड द्यावे लागणार आहे. या सगळ्या प्रकाराची जाणीव असलेले काही कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्यातल्या शाजिया इल्मी यांनी तर पक्ष सोडला आहे. पक्षाने देशातला एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून काम केले पाहिजे पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे इल्मी या अस्वस्थ झाल्या आहेत. इतरही अनेक नेते अरविंद केजरीवाल यांच्या पोरकटपणाने नाराज झाले आहेत. ते ज्या प्रकारचे राजकारण करीत आहेत ते असेच पुढे जारी राहिले तर हा पक्ष मोठा होणे शक्य नाही. महाराष्ट्रातही पक्षाची अवस्था वाईट आहे. अजित सावंत हे तर पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांनीही पक्षात संवाद नसल्याचे म्हटले आहे. अजून कार्यकर्त्यांच्या अस्वस्थपणाला फार वाचा फुटलेली नाही. पण राज्या राज्यात ती फुटायला लागेल तेव्हा आम आदमी पार्टीचे स्वरूप किती ढिसाळ आहे याचा साक्षात्कार होईल. पक्ष संघटना म्हणून ढिसाळ असेल तर काही चिंता करण्याचे कारण नसते. संघटना दुरुस्त करता येते. पण पक्षाचा विचारच नीट नसेल आणि पक्ष दिशाहीन झाला असेल तर मात्र त्याला गळती लागल्याशिवाय रहात नाही. येत्या एक-दोन वर्षात आम आदमी पार्टीला अशी गळती लागून हा पक्ष नामशेष झालेला दिसून येईल.

Leave a Comment