मुख्यमंत्री राज ठाकरे?

rajthakeray
लोकशाहीत कोणीही वल्गना करू शकतो. एखादा सामान्य माणूससुध्दा राष्ट्रपती होण्याचे स्वप्न बघू शकतो. मग राज ठाकरे यांच्या चाहत्यांना राज ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचे स्वप्न पडत असेल तर त्यावर बंदी आणता येणार नाही. मग ते स्वप्न किती का हास्यास्पद असेना. राज ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतील की नाही यावर सध्या चर्चा चालली आहे. पण मुळात ते एक राजकीय कार्यकर्ता म्हणून पात्र आहेत की नाही याचाच शोध आधी घ्यावा लागणार आहे. कार्यकर्त्यांशी त्यांची बोलण्याची पध्दत, सगळ्या जगाकडे हेटाळणीने बघण्याची चढेल वृत्ती आणि कोणाशीही तिरसटपणे बोलण्याची त्यांची खोड या गोष्टी त्यांना मुळात एक राजकीय कार्यकर्ता म्हणूनच अपात्र ठरवत असतात पण काय करावे एवढ्यावरही महाराष्ट्रात त्यांचे फॅन आहेत. राज ठाकरे यांच्याकडे कसलीही पात्रता नाही हे वारंवार दिसत असूनही त्यांचे हे फॅन जर एवढी वेड्यासारखी सूचना करत असतील तर त्यांना फॅन म्हणण्याऐवजी मॅड म्हणावे लागेल. राज ठाकरे हे स्वतःला नरेंद्र मोदींचे फॅन समजतात. मध्यंतरीच्या काळात त्यांनी आपले आदर्श म्हणून नितीन गडकरींचाही उल्लेख केला होता. राज ठाकरे यांना नरेंद्र मोदींचे वेडच लागले आहे. म्हणून माेदींच्या नेतृत्वाखालील आघाडीत नसतानासुध्दा त्यांनी आपल्या मनसेचे खासदार निवडून आल्यानंतर ते मोदींना पाठिंबा देतील असे जाहीर केले होते.

एखादा भक्त देवाची भक्ती करतो आणि तो भक्तीत एवढा चूर होऊन जातो की तो शेवटी स्वतः देवातच विलीन होऊन जातो तसे राज ठाकरे नरेंद्र मोदींचे फॅन म्हणवत म्हणवत स्वतःला नरेंद्र मोदीच समजायला लागले आहेत. त्यातूनच हे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीचे फॅड निर्माण झाले आहे. भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले त्याची भ्रष्ट नक्कल करत राज ठाकरे यांची ही उमेदवारी पुढे आली आहे. मात्र नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे तसेच भाजपा आणि मनसे यामध्ये कितीतरी फरक आहेत. नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले तेव्हा त्यांच्या पक्षाला केंद्रात सरकार बनविण्याइतपत जागा मिळतील असे वाटत होते तेवढी भाजपाची शक्ती होती पण मनसेचे तसे नाही. मनसे हा पक्ष मुख्यमंत्री निवडण्याइतपत जागा मिळवण्याची शक्यता पुढच्या २५ वर्षांत तरी दिसत नाही. एकूण २००९ साली कॉंग्रेसच्या कृपेने आणि शिवसेनेतल्या संभ्रमाने मनसेचे ११ आमदार निवडून आले. आता कॉंग्रेसची मदत राहिलेली नाही आणि शिवसेनेतला संभ्रम पूर्णपणे संपला आहे.

२००९ साली शिवसेनेतली मनसेच्या रूपाने झालेली फूट तुल्यबळ असेल असे अंदाज होते. पण शिवसेनाच भक्कमपणे उभी राहिलेली आहे. आता तर शिवसेनेतून एवढे नेते बाहेर पडूनसुध्दा त्यांचे १८ खासदार निवडून आले आहेत आणि मनसेच्या सगळ्या उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झालेल्या आहेत. मनसेची ताकद जर एवढीच असेल तर त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री कसा होणार आहे? नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्यात तर तुलना किती वेळा करावी? नरेंद्र मोदी १५ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. या पदावरून त्यांनी सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणारे काम करून दाखवले आहे आणि नंतरच ते केंद्राच्या राजकारणात आले आहेत. या बाबतीत राज ठाकरे यांच्या नावावर मोठा भोपळा जमा आहे. संधी असतानाही चांगले काम करून न दाखवणे आणि आपल्या कथित क्षमतेची मूठ झाकली ठेवून कार्यक्षमतेचा खोटा दिखावा करणे याबाबतीत राज ठाकरे यांची राहुल गांधींशी बरोबरी होऊ शकते. १९९५ ते १९९९ या साडेचार वर्षात महाराष्ट्रात युतीची सत्ता होती. त्या काळात राज ठाकरे यांनी कधीही एखादी जबाबदारी स्वीकारून आपले प्रशासकीय कौशल्य दाखवले नाही.

आपल्या हातात महाराष्ट्राच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट आहे असे म्हणत ते लोकांना थापा मारत आहेत. पण त्यांच्या ब्ल्यू प्रिंटचा एखादा तुकडासुध्दा त्यांनी त्यांच्या हातात असलेल्या नाशिक महानगरपालिकेत दाखवून दिलेला नाही. ते फार छान भाषण करतात असा, भाषण म्हणजे काय हे न कळणार्‍यांचा दावा असतो पण राज ठाकरे यांच्या त्या कथित भाषणात सुध्दा त्यांच्या कथित ब्ल्यू प्रिंटचे ओझरते सुध्दा दर्शन कधी घडलेले नाही. राज ठाकरे यांचे भाषण काही लोकांना आवडते. मात्र त्यांना त्यातले नेमके काय आवडते हे लक्षात येत नाही. भाषण करणार्‍या वक्त्याच्या बोलण्यात निर्भत्सना हे एक साधन असते आणि राज ठाकरे सतत कोणाची तरी निर्भत्सना करत असतात. कोणाचीही टिंगल केलेली आवडणारे काही टवाळ लोक असतात. त्यांनाच राज ठाकरे यांचे भाषण आवडत असते. मात्र त्यांच्या भाषणात विधायकता चुकूनसुध्दा डोकावत नाही. ते नरेंद्र मोदींशी बरोबरी करण्याचा आटापिटा करत असले तरी नरेंद्र मोदींच्या भाषणातून त्यांचा व्यासंग जसा प्रकट होतो तसा राज ठाकरे यांच्या भाषणातून अभावानेसुध्दा प्रकट होत नाही. त्यांच्या भाषणात नवी कल्पना, नवा विचार, सखोलता आणि गांभिर्य यांचा पूर्ण अभाव असतो. असा माणूस मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने बघण्याला कोणाचीची आडकाठी नाही. कारण लोकशाहीत तशी स्वप्ने बघण्याची पूर्ण मुभा आहे. परंतु वस्तुतः शरद पवार यांनी स्वतःला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करणे हे जितके हास्यास्पद ठरेल तितकीच राज ठाकरे यांची ही मुख्यमंत्रीपदाची वल्गना हास्यास्पद ठरेल. राज ठाकरे प्रामाणिकपणे शिवसेनेत राहिले असते आणि त्यांनी एखादी भूमिका नीट पार पाडली असती तर शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर होऊ शकले असते आणि ते आजच्या एवढे हास्यास्पद ठरले नसते.

Leave a Comment